कोपरगाव (जनता आवाज वृत्तसेवा):- गोदावरी नदी पात्रातील मोटार पाण्याबाहेर काढण्यासाठी गेलेल्या संतोष तांगतोडे हे पाण्यात वाहून गेल्याने दुःखद निधन झाले आहे.त्यांच्या कुटुंबाची सांत्वन भेट मा.आ.सौ. स्नेहलताताई कोल्हे यांनी घेतली. गोदावरी पात्रात वाहून जाणाऱ्या तरुणांना प्रसंगावधान राखून मदत करणाऱ्या सौ.ताईबाई पवार व छबूराव पवार यांचीही यावेळी भेट घेत घडलेल्या प्रसंगावर सौ.कोल्हे यांनी विचारपूस केली.
संततधार पावसामुळे नदीपात्रात पाणी वाढत असल्याने तांगतोडे बंधू मंजूर जवळील गोदावरी नदीपात्रातून विद्युत मोटारी बाहेर काढण्यासाठी गेले होते.मोठ्या प्रमाणात पाण्याचा ओघ वाढल्याने प्रदीप,अमोल आणि संतोष तांगतोडे तिघेही बंधू प्रवाहात वाहून जात होते.जवळच ताईबाई पवार व त्यांचे पती छबूराव पवार शेळ्या चारत होते.नदीच्या पाण्यात त्यांनी वाहणारे तरुण पाहिले असता पवार दाम्पत्याने कशाचीही पर्वा न करता मदतीसाठी धाव घेतली. छबूराव पवार यांनी स्वतः पाण्याच्या दिशेने झेप घेतली,तर ताईबाई यांनी आपली अंगावरील साडी पाण्याच्या प्रवाहात फेकून युवकांना बाहेर पडण्यास सहकार्य केले. कोणतेही नातेगोते नसतानाही ताईबाई यांच्या कृतीने हळव्या व धाडसी मातृत्वाचे दर्शन या घटनेतून झाले. जलप्रवाहात अडकलेल्या युवकांच्या दिशेने आपली अंगातील साडी आधार म्हणून फेकून त्यांना मदत करण्याचे धाडसामुळे या संकटात अमोल आणि प्रदीप यांना बाहेर काढणे शक्य झाले.स्व.संतोष तांगतोडे यांना बाहेर न पडता आल्याने त्यांचे मात्र प्राण वाचू शकले नाही याची तीव्र वेदना ताईबाई यांना झाली.
आजच्या धकाधकीच्या काळात माणुसकी लोप पावत चालली आहे.अशा वेळी आपल्या संवेदनशील वृत्तीने पुढे येणाऱ्या ताईबाई सारख्या महिला संकटात आदिशक्तीची ऊर्जा वाटतात. ताईबाई यांच्या प्रमाणे त्यावेळी आणखी मदतीला माणसे असती तर कदाचित तांगतोडे कुटुंबावर हा दुःखद प्रसंग ओढवलाच गेला नसता याची हुरहूर मात्र नेहमी जाणवत राहील.या संकटात तांगतोडे कुटुंबाला प्रशासनाने सर्वोतोपरी सहकार्य करण्याच्या सूचना सौ.कोल्हे यांनी यावेळी केल्या आहेत.
इतर दोघांप्रमाने स्व.संतोष तांगतोडे यांनाही वाचविण्यासाठी यश यायला हवे होते या भावनेने ताईबाई पवार व कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले