कोल्हार( जनता आवाज वृत्तसेवा ) :- बँकिंग आणि फायनान्स क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल कोल्हार भगवतीपुर येथील शिवधन अर्बन निधी लि. या वित्तीय संस्थेस आंतरराष्ट्रीय गोल्ड स्टार पुरस्कार प्रदान करण्यात आला.
थायलंड येथे पार पडलेल्या १८ व्या आंतरराष्ट्रीय उद्योग व्यवसाय मेळाव्या प्रसंगी शिवधनचे अध्यक्ष अजित रमेश मोरे यांना हा पुरस्कार वितरित करण्यात आला.
कोल्हार भगवतीपुरसारख्या ग्रामीण भागात शिवधन अर्बन निधीने अल्पावधीत नावलौकिक प्राप्त केला असून या संस्थेला मिळालेला हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार ही गौरवास्पद बाब आहे.
थायलंडचे उपपंतप्रधान, भारताचे राजदूत, नॅशनल अचिव्हर्स फोरमचे अध्यक्ष सुनील कुकरेजा, डॉ. व्ही. व्ही सोनी, उत्तराखंडचे मा. मुख्यमंत्री तिरथ सिंगजी रावत, दिल्ली विधानसभेचे सभापती रामनिवास गोयल आदी मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. आत्मनिर्भर भारत व थायलंड सरकारच्या संयुक्त विद्यमानाने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
शिवधन अर्बन निधी या संस्थेला महाराष्ट्र उद्योग रत्न पुरस्कारासह वेगवेगळे सहा पुरस्कार मिळाले आहेत. सदर संस्था ही आयएसओ मानांकन प्राप्त आहे. सामाजिक व धार्मिक कामात अग्रेसर असलेल्या या संस्थेच्या माध्यमातून कोरोना काळात सॅनिटायझर फवारणी, मास्क वाटप, कोविड योद्धा सन्मान पुरस्कार वाटप करण्यात आले.
याशिवाय शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप तसेच आदर्श शिक्षक पुरस्कार, गुणवंत विद्यार्थ्यांचे गुणगौरव करण्यात पुढाकार घेतला जातो. रक्तदान शिबिर, झाडे लावणे, ग्राम स्वच्छता या सारख्या सामाजिक उपक्रम राबविण्याकडे या संस्थेचा विशेष कल आहे.
संस्थेचे अध्यक्ष अजित मोरे हे एमबीए फायनान्स पदवी प्राप्त उच्चशिक्षित युवक असून बिकट आर्थिक परिस्थितीतून शिक्षण करून नोकरीच्या मागे न जाता व्यवसाय निर्मिती करून रोजगार उपलब्ध करून दिला आहे.
ते सध्या कोल्हार भगवतीपुर देवालय ट्रस्टचे विश्वस्त, कोल्हार येथील न्यू इंग्लिश स्कूल स्थानिक सल्लागार समितीमध्ये सदस्य, शंकरनाना खर्डे पाटील सामाजिक संघटनेचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.