श्रीरामपूर ( जनता आवाज वृत्तसेवा):- शहरातील ज्ञानधारा मल्टीस्टेट को. ऑप. क्रेडिट सोसायटीच्या संचालक मंडळाविरुध्द खातेदाराची फसवणूक केल्याप्रकरणी अध्यक्ष, उपाध्यक्षांसह पंधरा संचालकांविरुध्द फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीची 31 लाख 61 हजार 274 रुपयासह इतर सात ठेवीदारांची 34 लाख 39 हजार 078 रुपये अशी एकूण 66, 00, 352 रुपये एवढ्या रकमेची फसवणूक झाली आहे.
याप्रकरणी कांदा मार्केट परिसरातील मीरा पांडुरंग जायभाय (वय 45) यांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे की, माझे ज्ञानधारा मल्टीस्टेट या पतसंस्थेत बचत खाते आहे. सन 2022 पासून या पतसंस्थेची सभासद आहे. मी व माझे पती पतसंस्थेत गेलो असता पतसंस्थेच्या चेअरमन, व्हा. चेअरमन तसेच संचालकांनी तुम्ही आमच्या पतसंस्थेत मुदत ठेव ठेवा. मुदत ठेवीवर 12 टक्के व्याज देवू असे सांगितले. तसेच तुम्ही काळजी करु नका, तुमच्या मुलांच्या शिक्षणाच्या वेळेस व मुलीच्या लग्नच्यावेळी तुम्हाला जास्त पैसे मिळतील, असे म्हणून मी त्यावर विश्वास ठेवून माझ्याकडील 31 लाख 61 हजार 274 रुपयाच्या मुदतठेव पावत्या द.सा.द.शे 12 टक्के दराने पतसंस्थेत केल्या.
पतसंस्थेत केलेल्या पावत्यावरील रकमांची मला मुलीच्या लग्नासाठी व मुलांच्या शिक्षणासाठी आवश्यकता असल्याने पतसंस्थेच्या येथील शाखेत जावून पावत्यावरील व्याजाची मागणी केली. त्यावेळी मला आता कॅश शिल्लक नाही असे सांगितले. दोन दिवसांनी मी पुन्हा खात्यावरुन पैसे काढण्यासाठी गेले असता पुन्हा कॅश शिल्लक नाही असे उत्तर मिळाले. तुम्ही नंतर या असे सांगितले. मी वारंवार पतसंस्थेचे संचालक, मॅनेजर, चेअरमन यांना माझी अडचण सांगितली. त्यावर त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली.
याबाबत जास्त माहिती घेतली असता या पतसंस्थेच्या संचालक मंडळाने खोटी प्रलोभने देवून जास्त व्याजाचा परतावा देण्याचे कबुल करुन, ठेवीदारांच्या पैशाचा स्वतःच्या फायद्यासाठी उपयोग करुन घेतला. त्यांनी बर्याच ठेवीदारांची फसवणूक केल्याचे मला समजले. इतरांप्रमाणे माझीही फसवणूक झाल्याचे माझ्या लक्षात आले.
याप्रकरणी ज्ञानधारा मल्टीस्टेट को. ऑप. क्रेडीट सोसायटी लि. बीड, शाखा श्रीरामपूर या पतसंस्थेचे चेअरमन सुरेश ज्ञानोबा कुटे (रा. बहिरवाडी, अंबेजोगाई बीड), व्हा. चेअरमन यशवंत वसंत कुलकर्णी (रा.बीड) तसेच संचालक वसंत शंकरराव सतले (रा. ज्ञानधारा भवन, जालना रोड बीड), वैभव यशवंत कुलकर्णी (रा. शिंदेनगर बीड अंबेजोगाई), कैलास काशीनाथ मोहीते (रा. जिरेवाडी, बीड), शिवाजी रामभाऊ पारसकर (रा. बीड), रविंद्र मधुकर तलवे (रा.बीड), आशिष पद्माकर पाटोदेकर (रा.बीड), आशा पद्माकर पाटोदेकर (रा. बीड), रेखा वसंतराव सतले (रा.बीड), रघुनाथ सखाराम खारसाडे (रा.बीड), रविंद्र श्रीरंग यादव (रा.बीड), दादाराव हरीदास उंदरे (रा. ज्ञानराधा भवन, जालना रोड) व ईतर कर्मचारी निर्मल चव्हाण (रा. जाफराबाद, जि. जालना), विठोबा बनकर (मु. पो. गोमळवाडा, ता. शिरुरकासार जि.बीड) तसेच ईतर जबाबदार व्यक्ती यांच्याविरुध्द श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात भा. दं. वि. कलम 420, 409, 467, 120 (ब) सह महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय संस्थांमधील हितसंबंधाचे संरक्षण अटी 3, 4 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
–यांचीही झाली फसवणूक
फिर्यादी मीरा जायभाय तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात आल्या असता त्याठिकाणी संतोष कचरु पटारे यांची 4 लाख 24 हजार रुपये, संदीप शिवाजी गवारे (रा. शिरसगाव) 8 लाख 30 हजार रुपये, मीना संतोष पटारे (रा. टाकळीभान) यांची 7 लाख, बाळासाहेब गोविंद ढाकणे (रा. अशोकनगर) यांची 2 लाख 68 हजार 905 रुपये, राजेंद्र दत्तात्रय पवार (रा.श्रीरामपूर) यांची 1 लाख 77 हजार 543 रुपये, गायत्री पराग पवार (रा. श्रीरामपूर) यांची 12 लाख 27 हजार 630 रुपये, शिवाजी काशिनाथ गवारे 2 लाख 35 हजार या ठेवीदारांचीही फसवणूक झाली असल्याचे समजले.