श्रीरामपुर( जनता आवाज वृत्तसेवा ) :- एकमेकांच्या नांव, गावाचा परिचय नसताना दोघांची शेयर चॅटवर दोन दिवसांत ओळख झाली. पुढील दोन दिवस ईस्टाग्रामवर चॅटींग होऊन पाचव्या दिवशी दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थीनींने म़ोबाईलवर विद्यालयाचे लोकेशन टाकल्यावरून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून ८० कि. मी. अंतराहुन हिरो चक्क विद्यालयात हजर होऊन धूम स्टाईलने विद्यार्थींला पळून घेऊन जाण्याचे तयारीत असतानाच विद्यालयाचे मुख्याध्यापक व स्टाफच्या सतर्कतेने दोघेही जाळ्यात अडकल्याची घटना काल, दुपारी माळवाडगांव (ता.श्रीरामपूर) येथे घडल्याने शिक्षक व पालक वर्गात खळबळ उडाली.
याबाबतची हकिगत अशी की, श्रीरामपूर तालुक्यातील माळवाडगांव येथे गजबजलेल्या परिसरालगतच खासदार गोविंदराव आदिक ग्रामीण शिक्षण संस्थेचे न्यु इंग्लिश स्कूल माध्यमिक विद्यालय आहे. सोमवार दि.२९ रोजी सकाळी सर्व वर्गाचे क्लास सुरू असताना, समोरच्या मोटार सायकल स्टँडवर ऐटीत मोटार सायकल लावून अंगात पांढरा टी शर्ट पाठीवर बॅग लटकवलेल्या तरूणाने विद्यालयाचे व्हरांड्यात प्रवेश केला.
मुख्याध्यापक जी. बी. नाईक बाहेरच उभे होते. येणाऱ्या व्यक्तीकडे पाहत असतानाच समोरच्याने दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थीनींचे नांव सांगुन मी तीच्या आत्याचा मुलगा असून तीला घेण्यासाठी आलो आहे. तीला अर्जंट तीच्या घरी भामाठान घेऊन जायचे आहे. विद्यार्थीस निरोप दिल्याने तीही पाठीवर बॅग लटकवून वर्गाबाहेर आली. एकमेकांना पाहिलेले नसताना लगबगीने तो तरुण त्या विद्यार्थीनीजवळ जावून तीच्याशी कुजबुज करू लागला. तेवढ्यात शिक्षक मुकुंद कालांगडे व एस. बी. उंडे वर्गाबाहेर मुख्याध्यापक नाईक यांच्या सोबतीला आले.
उंडे यांना संशय आल्याने त्या विद्यार्थीनीच्या घरी भामाठानला मोबाईलवरून संपर्क साधला. त्यांनी सांगितले आम्ही कुणा भाच्याला पाठवले नाही अन् आम्हाला भाचाही नाही. शिक्षक स्टाफच्या हा गौडबंगाल हेरिफेरीचा प्रकार लक्षात आला. तेवढ्यात तो तरुण विद्यार्थीनीसह मोटारसायकलकडे धाव घेण्याचे तयारीत असतानाच सेवक टी. इ. चौधरी यांनी कॉलर पकडली. अन्य शिक्षकांच्या मदतीने त्यास ओढत कार्यालयात आणले. वीस मिनिटात विद्यार्थीनीचे नातेवाईक हजर झाले.
आजुबाजुला गजबजलेल्या परिसरात ही वार्ता समजताच शेकडो तरूणांची विद्यालयासोर गर्दी झाली. हळूहळू भामाठान येथील तरूणांची ही गर्दीत भर पडली. गावातील शालेय शिक्षण समिती पदाधिकारी, उपसरपंच, पत्रकार आल्यानंतर त्या तरूण विद्यार्थ्यांस बंद खोलीत घेण्यात येऊन संरक्षण देण्यात आले. कारण बाहेर तरूण आरडाओरड करून त्यास आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी करत होते. श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनला घटनेची खबर देण्यात आली.
संतप्त जमावाच्या तीव्र भावना पाहून विद्यार्थीनी तीचे आईवडील बाहेरून आलेला तो तरुण यांना गाडीत बसवून श्रीरामपूरला पोलिस ठाण्यात पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्यासमोर हजर करण्यात आले.
दोघांचेही मोबाईल पोलीसांनी हस्तगत केले होते. त्या तरूणाने दिपक तातेरांव नरोडे (रा. वसु सायगांव ता. गंगापूर) असे सांगितले. हा विद्यार्थी देवगाव रंगारी येथील सिनियर महाविद्यालयात प्रथम वर्ष शिकत आहे. मुलगी दहावीत शिकत असून अल्पवयीन आहे.
भामाठान येथील विद्यार्थीनीचे आई-वडील, नातेवाईक भामाठान येथील प्रतिष्ठित, अन् वसु सायगांव येथील त्या विद्यार्थ्यांचे वडील व नातेवाईक यांच्या विनंतीवरून मुलीचे पुढील भवितव्य पाहून गुन्हा दाखल न करता कागदोपत्री लिहून समज देण्यात आली.
मुलींना मोबाईलपासून दुर ठेवावे
या घटनेतील विद्यार्थीनी स्वत: मोबाईल वापरत नसे. शाळेतून घरी गेल्यावर वडीला़चा मोबाईल तीच्याकडेच राहत होता. खुप वापर करते म्हणून वडील लवकर रिचार्ज मारत नसे. म्हणून या चाणाक्ष मुलीने घटनेतील समोरच्या मुलांकडून रिचार्ज मारून घेतला होता. मुलांची परिस्थिती मध्यम श्रमजीवी पध्दतीची असुन तो महाविद्यालयीन शिक्षणाबरोबर पोलीस भरतीची तयारी करत आहे. त्याने मोटारसायकल चुलत्याची आणली व सोबत उसनवार करून अडीच हजार रुपये आणले होते.
पालक वर्गाकडून शिक्षकांचे कौतुक
विद्यालयातून पळुन जाणारी मुलगी मुख्याध्यापक व शिक्षक कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेने आई-वडीलांच्या ताब्यात सुखरूप गेली. काही वेळातच जेवणाची मधली सुट्टी होणार होती. त्या सुट्टीत हा प्रकार घडला असता तर सर्वच अनभिज्ञ राहिले असते. पालकांनी शिक्षकांचे आभार मानून कौतुक केले.