श्रीरामपूर ( जनता आवाज वृत्तसेवा):- शहरातील एका डॉक्टरांना शेअर्स मार्केटमध्ये जास्त परतव्याचे आमिष दाखवून 10 लाख 8 हजार रुपयास गंडा घातल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दोन जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील बेलापूररोड परिसरातील डॉ. प्रशांत चव्हाण यांच्याशी अहिल्यानगर येथील सुहास रायकर व देवीदास रायकर (दोघे रा. पिंपळगांव माळवी, ता. नगर) या दोघांनी गोड बोलून त्यांच्याबरोबर ओळख करून, शेअर्समध्ये जास्त परतावा मिळवून देवू असे सांगून, डॉ. चव्हाण यांना 10 लाख 8 हजार रुपये गुंतवणूक करायला लावून त्यांची फसवणूक केली.
याप्रकरणी डॉ. प्रशांत चव्हाण यांच्या फिर्यादीवरून सुहास रायकर, देवीदास रायकर यांच्याविरुद्ध फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेचा पुढील तपास पोलीस निरिक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान सोळंके हे करत आहे.
शेअर्स मार्केट यामध्ये जास्त परतव्याचे आमिष दाखवून गंडा घालण्याचे प्रकार वाढले आहेत. जनतेला कमी कालावधीत जास्त पैसा हवा असल्याने जास्त हव्यासापोटी अशा घटना घटत आहेत. त्यामुळे नागरिकांनी अशा फसव्या योजनांपासून सावध रहावे.