शिर्डी, दि.४ मे (उमाका वृत्तसेवा) -शासकीय योजनांची जत्रा’ या उपक्रमांतर्गंत संगमनेर व अकोले तालुक्यातील विद्यार्थी व नागरिकांना विविध महसूली, शैक्षणिक दाखल्यांचे तत्परतेने वितरण करण्यात येणार आहेत. यासाठी ५ मे १५ जून २०२३ या कालावधीत विशेष मोहीमेचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहीमेचा लाभ घ्यावा. असे आवाहन संगमनेर उपविभागीय अधिकारी डॉ.शशिकांत मंगरूळे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने “जत्रा शासकीय योजनांची – सर्वसामान्यांच्या विकासाची ” या उपक्रमांचे राज्यात आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत महसूल विभागामार्फत देण्यात येणारे विविध दाखले, प्रमाणपत्र विनासायास उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. यासाठी विद्यार्थी, नागरिकांनी आपल्या जवळच्या सी.एस.सी. केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र , महा ई सेवा (सेतू) केंद्र यांचेशी संपर्क साधून आवश्यक ती कागदपत्रे लवकरात लवकर सादर करावीत. असे आवाहन ही श्री.मंगरूळे यांनी केले आहे.



