नगर ( जनता आवाज वृत्तसेवा ):-महिलांना त्यांच्या व्यवसाय वृध्दीसाठी विविध संधी उपलब्ध झाल्या पाहिजेत. अशा संधी उपलब्ध करून देण्यासाठी तुम्ही मला कधीही हाक द्या, मी सदैव तुमच्यासोबत असेल अशी साद जिल्हा परिषदेच्या मा.सदस्या राणीताई लंके यांनी नगर शहरातील महिलांना घातली.
रोटरी क्लब ऑफ अहमदनगर प्रियदर्शनीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या श्रावण शॉपींग महोत्सवाचे उद्घाटन लंके यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्यांनी उपस्थित महिलांशी संवाद साधला.
यावेळी बोलताना लंके म्हणाल्या, श्रुती बत्तीन यांनी श्रावण महोत्सवाचे आयोजन करून महिलांनासाठी संधी उपलब्ध करून दिली याचा आनंद आहे. असेच महोत्सव होत रहावेत. महिलांना त्यांच्या व्यवसाय वृध्दीसाठी विविध प्रकारच्या संधी उपलब्ध झाल्या पाहिजेत. त्या उपलब्ध करून देण्यासाठी तुम्ही मला कधीही हाक द्या, मी सदैव तुमच्यासोबत असेल अशी ग्वाही देतानाच महिलांनी स्वावलंबी व्हावे, त्यांंच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळावी, त्यांच्या कला गुणांना वाव मिळावा यासाठी असे शॉपींग महोत्सव आयोजित करण्याची आवष्यकता असल्याचे लंके म्हणाल्या.
एका छताखाली अनेक उत्पादने उपलब्ध असणाऱ्या या महोत्सवात विविध प्रकारच्या राख्या, महालक्ष्मी सजावटीचे साहित्य, ड्रेस मटेरियल, ज्वेलरी गिफट आर्टीकल्स, मसाले, आयुर्वेदीक प्रॉडक्ट आदी शंभरहून अधिक स्टॉल या महोत्सवात लावण्यात आले आहेत. महोत्सवात खाद्यपदार्थांचा आस्वाद देण्याचीही सुविधा असून शनिवार व रविवारी पार पडलेल्या या महोत्सवात ग्राहकांनी मोठया संख्येने हजेरी लावली होती.
यावेळी छायाताई फिरोदीया, वैशाली कोलते, नीना मोरे, आशाताई फिरोदिया, ज्योती गांधी, लता भगत, शुभा भागवत, डॉ. प्रियंका गांधी, स्वाती गुंदेचा, मिनल बोरा आदी उपस्थित होत्या. विभा तांबडे यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन केले.