श्रीरामपूर( जनता आवाज वृत्तसेवा):- श्रीरामपूर तालुक्यातील जनतेने माझ्यावर भरभरून प्रेम केले. माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातील सदस्याला आमदार केले. या ऋणातून मुक्त होण्यासाठी आपण मतदारसंघात कोट्यावधी रुपयांची कामे केली. विकास कामे करताना शहरी व ग्रामीण तसेच आपला व विरोधक असा भेदभाव केला नाही. अजूनही काही कामे राहिली आहेत. तीही पुढील काळात पूर्ण करू, असे प्रतिपादन आमदार लहू कानडे यांनी केले.
काँग्रेस बळकटीकरण व आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित विधानसभा मतदारसंघातील बूथ कमिटी, ग्राम काँग्रेस कमिटी पदाधिकारी तसेच मतदारांशी संवाद दौऱ्यात कडीत बु, कडीत खु, मांडवे, फत्याबाद, कुरणपूर व गळणींब येथे झालेल्या बैठकीत आ. कानडे बोलत होते. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण पाटील नाईक, प्रा. कार्लस साठे, सतीश बोर्डे, सचिन जगताप, विष्णूपंत खंडागळे, सरपंच सागर मुठे, अमोल आदिक, ज्ञानदेव आदिक, शिवाजी पवार या दौऱ्यात त्यांच्यासोबत होते.
आ. कानडे म्हणाले, आपल्या कार्यकाळात आपण रस्ते, वीज, पाणी, शेती, महिला, युवक यांच्यासह तालुक्यातील विविध प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला, बाभळेश्वर- नेवासा तसेच श्रीरामपूर-बेलापूर रस्ता चौपदरीकरण करून डांबरीकरण केले. श्रीरामपूर एमआयडीसीमध्ये 220 के.व्ही.चे उच्चदाब (हायपाँवर) सबस्टेशन मंजूर केल्याने तेथील उद्योग वाढत आहेत. बेरोजगारांना त्याचा लाभ मिळणार आहे. वांजुळपोई (ता. राहुरी), घोगरगाव (ता. नेवासा) व श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगाव येथे वीज उपकेंद्र मंजूर केले. सत्ता बदलल्याने उक्कलगाव येथील वीज उपकेंद्र रखडवले गेले. ते पुढील काळात पूर्ण करू, पाटपाण्याचे नियोजन करून पाटपाण्यासाठी शेतकऱ्याची ओरड होऊ दिली नाही. जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा डिजिटल केल्या. तरुणांसाठी ओपन जिम्स व साहित्य दिले. तालुक्यात अनेक ठिकाणी बसस्थानके व तलाठी कार्यालयाची उभारणी केली. या परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात एका मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे या परिसरात 100 पेक्षा अधिक हायमॅक्स दिवे दिले. यापूर्वी कोणत्या आमदाराने एका गावात 16-16 दिले? असा प्रश्न त्यांनी केला.
यावेळी अरुण पाटील नाईक, विष्णुपंत खंडागळे, सचिन जगताप, ज्ञानेश्वर वडीतके, सोहम शिंदे यांनी आपल्या मनोगतातून आ. कानडे यांनी केलेल्या कामाची माहिती दिली. यावेळी प्रा. एकनाथ ढोणे, राधाकृष्ण तांबे, अण्णासाहेब वडीतके, कदीर पटेल, दगडू पावले, तुकाराम चिंधे, ऍड. चंद्रकांत बनसोडे, अण्णासाहेब ढोणे, बाबासाहेब होन, जालिंदर हिरगळ, संतोष नान्नोर, कचरू वडीतके, चंद्रकांत बनसोडे, सुभाष थोरात, अण्णासाहेब हळनोर, निसार पटेल, इसाक पटेल, रफिक पटेल, संतोष चांडे, मारुती चितळकर, जालिंदर पारखे, सुभाष देठे, नामदेव जाटे, विठ्ठल वडीतके, सुभाष भोसले यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.