श्रीरामपूर( जनता आवाज वृत्तसेवा ): – शहरात एमआयडीसी असुन त्यातील पन्नास टक्के कंपन्या बंद आहेत. उर्वरीत चालु कंपन्यात परप्रांतीय काम करतात. तालुक्यातील तरुणांना नोकरीसाठी वणवण करावी लागत असल्याने ते नोकरी-धंद्यांसाठी मुंबई, पुण्यासारख्या ठिकाणी धाव घेताना दिसत आहेत. श्रीरामपूर तालुक्यात कुठल्याही नोकरीच्या संधी उपलब्ध नसल्याने तसेच त्यांना पर्याय उपलब्ध होत नसल्याने हा निर्णय घ्यावा लागत असल्याची वस्तुस्थिती आहे. शहरात सुसज्ज समजल्या जाणार्या एमआयडीसीत केवळ बोटावर मोजण्याइतक्या कंपन्या चालु असल्याने आणि नोकरीच्या हव्या तशा संधी उपलब्ध नसल्याने तरुणांवर बेरोजगारीचा शिक्कामोर्तब केला जात आहे. तरुणांना नोकरी मिळालीही तरी ती या महागाईच्या दुनियेत साथ देणारी नसल्याची खंत हेमंत ओगले यांनी व्यक्त केली.
श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावात जाऊन तेथील शेतकरी, युवक आणि जनतेसोबत संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी आणि काँग्रेस पक्षाचे ध्येय धोरणे जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी जिल्हा बँकेचे संचालक मा. उपनगराध्यक्ष करण ससाणे आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणिस हेमंत ओगले यांच्या नेतृत्वाखाली तसेच जिल्हा परिषदेचे सदस्य बाबासाहेब दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष दिपाली ससाणे यांच्या उपस्थितीत शेतकरी युवक संवाद यात्रा काढण्यात आली.
यात्रेच्या अकराव्या दिवशी हेमंत ओगले यांनी सकाळच्या सत्रात ग्रामस्थांसमवेत संवाद साधला. येथील कॉर्नर सभेत मनोगत व्यक्त करताना हेमंत ओगले म्हणाले की, आज श्रीरामपूर आणि राहूरी अशा दोन एमआयडीसी असूनही त्यात स्थानीक तरुणांना नोकरीच्या संधी नाही. यासाठी येथील तरुण मुंबई, पुण्याची वाट धरत आहेत. तर काही आपला छोटासा व्यवसाय थाटत आपला जीवन चरितार्थ चालवताना दिसत आहे. आजकालची तरुणाई ही स्मार्ट असून त्यांना जास्त सांगण्याची गरज पडत नसल्याची स्थिती आहे. अनेक तरुण हे आपले शिक्षण संपल्यावर जेथे पैसा जास्त आहे, त्या गावाला जाणे पसंत करतात. चांगली नोकरी आणि हुद्दा त्यांना या ठिकाणी मिळत नसल्याने त्यांचा बाहेर जाण्यासाठीचा कल वाढत आहे. पण याचा लोकप्रतिनिधींनी विचार करून या तरुणांचे ज्ञान जर तालुक्याच्या विकासासाठी वापरले असते तर तालुक्याचा विकास झपाट्याने झाला असता.
यावेळी जिल्हा बँकेचे संचालक मा. उपनगराध्यक्ष करण ससाणे म्हणाले की, सध्याची युवा पिढी शिकलेली असून त्यांच्या कडे चांगल स्किल आहे. त्यांना सर्व गोष्टीची जाणीव आहे. एमआयडीसी भागात बेरोजगारीचे सावट काढून या युवकांना आपल्या हक्काच्या ठिकाणी काम द्यायला काहीच हरकत नाही. जेणेकरून तरुणांना आपले घर न सोडता नोकरी मिळून हव्या त्या पगारावर काम करून आनंद उपभोगता येईल. आतापर्यंत या गावांमध्ये मुलभूत सुविधा निर्माण करण्यासाठी स्व. जयंतराव ससाणे यांनी भरघोस निधी दिला. मतदारसंघात त्यांचा एक वेगळा ऋणानुबंध होता. आपल्या आशिर्वादाची आम्हाला गरज आहे असेही यावेळी ते म्हणाले
यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य बाबासाहेब दिघे म्हणाले की, किमान ७० टक्के स्थानिकांना रोजगार मिळाला पाहीजे यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत.
दरम्यान भविष्यात विकासकामांना आणखी गती देण्यासाठी हेमंत ओगले हेच चांगला पर्याय आहे. श्रीरामपूर विधानसभा हा काँग्रेसचा बालेकिल्ला असल्याने तसेच येथील मतदारांना हेमंत ओगले यांना असलेली समस्यांची जाण असलेला पर्याय उपलब्ध झाला आहे. दरम्यान यावेळी स्व. जयंतराव ससाणे यांच्यावर प्रेम करणारे मान्यवर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.