संगमनेर (जनता आवाज वृत्तसेवा ):-एक नवविवाहित दाम्पत्याने साकुर मध्ये गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संगमनेर तालुक्यातील साकूरजवळील महालदरा इथे ही घटना घडली आहे. वैभव आमले आणि स्नेहा आमले अशी या नवदाम्पत्याची नावे आहेत.
हे दोघेही पुण्यात नोकरीला होते. मात्र गावी झाडाला गळफास घेत या दोघांनी आपले जीवन संपवले. रविवारी रात्री 8 वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वैभव आणि स्नेहा हे दाम्पत्य महालदरा या आपल्या गावी मागील दोन दिवसांपासून परतले होते. अगदी तीन महिन्यांपूर्वीच दोघांचा विवाह झाला होता. विवाहानंतर दोघेही पुणे शहरातील एका खासगी कंपनीत नोकरी करत होते. मात्र दोघेही अचानक गावी निघून आले. रविवारी सायंकाळच्या सुमारास त्यांनी मुळा नदीच्या जवळील मांगमळीत झाडाला गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली.
मृत वैभव आमले आणि स्नेहा आमले वाऱ्यासारखी पसरली घटनेची बातमी दरम्यान, वैभव आणि स्नेहा यांचे मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत एका गावकऱ्याला दिसून आला. त्याने आरडाओरड केली असता आसपासचे लोक धावून आले. वैभव आणि स्नेहाने आत्महत्या केल्याची घटना संपूर्ण तालुक्यात वाऱ्यासारखी पसरली. गावकऱ्यांनी या घटनेची माहिती तातडीने पोलिसांना दिली. माहिती मिळताच घारगाव पोलीस घटनास्थळी हजर झाले. दोघांचेही मृतदेह खाली उतरून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले.
आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट या दोघांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही. पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून घटनेचा तपास सुरू केला आहे. तसेच दोघांच्या मृतदेहाशेजारुन कोणतीही चिठ्ठी मिळाल्याची माहिती नाही.