पारनेर( जनता आवाज वृत्तसेवा):-संघर्ष योध्दा मनोज जरांगे यांची मराठा आरक्षणाबाबत जनजागृतीसाठी सुरू असलेल्या राज्यव्यापी शांतता रॅलीने आज, सोमवारी दुपारी साडेबारा वाजता नगर जिल्ह्यात प्रवेश केला.पारनेर तालुका अखंड मराठा समाजाच्या वतीने नगर जिल्ह्याच्या हद्दीवर,बेलवंडी फाटा येथे फटाक्यांच्या आतषबाजीत, जल्लोषात स्वागत करण्यात आले.या ठिकाणी त्यांनी काही मिनीटे कार्यकर्त्यांशी संवाद साधला.तब्येतीची काळजी घेण्याची विनंती कार्यकर्त्यांनी जरांगे पाटलांना केली.
यावेळी मराठा सेवक डॉ.श्रीकांत पठारे,संजय वाघमारे,बाबूशेठ राक्षे, दत्तात्रेय आंबुले,संभाजी औटी,रामराव गाडेकर,मच्छिंद्र मते, सतिश वाघमारे,नंदकुमार दरेकर,रावसाहेब कासार,राजेश चेडे,दिलीप भालेकर,विठ्ठल मुंगसे,बाबासाहेब रेपाळे,सुरेश राक्षे,लव यादव, सुभाष वाळूंज, सुनील राक्षे आदी उपस्थित होते.पारनेर फाट्यावर राळेगणसिद्धीचे सरपंच जयसिंग मापारी,भाऊसाहेब गाजरे यांनी तर सुपे येथे सुखदेव पवार,योगेश रोकडे, सुरेंद्र शिंदे यांच्यासह कार्यकर्त्यांनी मनोज जरांगे यांचे स्वागत केले.
मनोज जरांगे पाटील यांचा ताफा सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास पुण्याहून नगरच्या दिशेने निघाला.रविवारी पूर्ण दिवस जरांगे पाटील पुणे येथे होते.रविवारी रात्री त्यांचा मुक्काम पुणे येथेच होता.त्यामुळे आजचा (सोमवार) पूर्ण दिवस नगर जिल्ह्यासाठी राखीव ठेवण्याचे नियोजन करण्यात आले होते.मनोज जरांगे पाटील नगर येथे वेळेवर पोहोचावेत हा हेतू त्यामागे होता.नियोजनाप्रमाणे जरांगे पाटील यांच्या वाहनांचा ताफा पुण्यावरून निघाल्यानंतर थेट नगर जिल्ह्याच्या हद्दीवर बेलवंडी फाटा येथे येऊन थांबला तेथे नगर जिल्ह्याच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.
जरांगे पाटलांनी घेतली सुप्यात विश्रांती
मनोज जरांगे यांना सातारा येथील सभेत भाषण करताना अस्वस्थ वाटू लागले.बोलत असतानाच ते खाली बसले.त्यावेळी त्यांचे हात थरथरत होते.त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले.सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला त्यांना देण्यात आला होता.मात्र सातारा येथे उपचार घेतल्यानंतर त्यांनी विश्रांती घेण्याचे टाळले.रविवारी पुणे येथील रॅली आटोपल्यावर त्यांना सह्याद्री रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.तेथेही त्यांना पूर्ण विश्रांतीचा सल्ला देण्यात आला.मात्र जरांगे पाटील यांनी नगर येथे उपचारासाठी दाखल होतो असे सांगत आज, सोमवारी नियोजित कार्यक्रमानुसार नगरकडे प्रयाण केले.प्रवासादरम्यान थकवा जाणवू लागल्याने त्यांनी सुपे येथे काही काळ विश्रांती घेतली.दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास जरांगे यांच्या वाहनांच्या ताफ्याने नगरकडे कूच केले.