संगमनेर( जनता आवाज वृत्तसेवा):- डॉ. आर. एस. गुंजाळ वेलफेअर फौंडेशन संचलित वृंदावन कृषी महाविद्यालय, गुंजाळवाडी पठार, संगमनेर व पुण्यातील आंतरराष्ट्रीय शिक्षणातील नामांकित ओईसीएस संस्था यांच्यामध्ये नुकताच परदेशातील शिक्षणाच्या संधी या संदर्भात सामंजस्य करार संपन्न झाला, अशी माहिती महाविद्यालायाचे प्राचार्य डॉ. रोहित उंबरकर यांनी दिली.
या सामंजस्य करारान्वये फक्त महाविद्यालयातीलच नव्हे तर परिसरामधील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना देखील परदेशातील सर्व शाखांमध्ये शिक्षणाच्या संधी उपलब्ध होणार आहेत. त्यासाठी महाविद्यालयामध्ये वृंदावन आंतरराष्ट्रीय कक्ष स्थापन करण्यात आलेले आहे.
या कक्षातर्फे विद्यार्थ्यांना परदेशात असणाऱ्या संधी, त्यासाठी उपलब्ध असणाऱ्या शिष्यवृत्या, प्रवेश परीक्षा, परदेशात शिक्षण घेण्यासाठी आवश्यक असलेल्या भाषे संदर्भातील परीक्षा (जीआरई, टोफेल, आईईएलटीएस), आंतरराष्ट्रीय विद्यापीठाची निवड, आवश्यक असलेली कागदपत्रे आदी माहिती व मार्गदर्शन केले जाणार आहे. अहमदनगर, संगमनेर व इतर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी वृंदावन आंतरराष्ट्रीय कक्षाचा फायदा घेवून परदेशातील शिक्षणाची संधी साधावी, असे आवाहन संस्थेचे सचिव राहुल गुंजाळ यांनी केले.
सदर सामंजस्य करारासाठी संस्थेतर्फे सचिव राहुल गुंजाळ व प्राचार्य डॉ. रोहित उंबरकर तसेच ओईसीएस संस्थेतर्फे डॉ. सत्यानारायनन उपस्थित होते.