नगर ( जनता आवाज वृत्तसेवा ):- राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी तसेच कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी राज्यात “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यात आत्तापर्यंत 7 लक्ष महिलांचे अर्ज पात्र ठरले असुन पात्र ठरलेल्या महिलांना त्यांच्या बँक खात्यावर जुलै व ऑगस्ट, 2024 या दोन महिन्याचे प्रत्येकी 1 हजार 500 रुपयांप्रमाणे एकूण 3 हजार रुपयांचा प्रत्यक्ष निधी वितरणाचा राज्यस्तरीय शुभारंभ राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये 17 ऑगस्ट, 2024 रोजी दुपारी 12.00 वाजल्यापासून बालेवाडी क्रीडासंकुल, पुणे येथे होणार आहे.
या कार्यक्रमाचे सहप्रक्षेपण, सहकार सभागृह, अहमदनगर येथुन राज्याचे महसुल, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व इतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी मनोज ससे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.