8.6 C
New York
Thursday, November 21, 2024

Buy now

spot_img
spot_img

संतांच्या निरुपणातून मनाला उभारी, समाजाला सकारात्मक दिशा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंचाळे येथील श्री संत सद्‌गुरू योगिराज गंगागिरीजी महाराज 177 व्या अखंड हरिनाम सप्ताहास भेट नाशिक जिल्ह्यातील 6 वारकऱ्यांच्या वारसाना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी पाच लाखांच्या मदतीची घोषणा

नाशिक( जनता आवाज वृत्तसेवा ) :- संतांचे आध्यात्मिक अधिष्ठान मोठे आहे. महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाची ताकद मोठी आहे. ही परंपरा भजन, कीर्तन, हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून गावागावात सुरू आहे. भजन कीर्तनातून समाजप्रबोधनाचे मोठे काम केले जाते. संतांच्या अभंग, प्रवचन आणि निरुपणातून मनाला उभारी व समाजाला सकारात्मक दिशा मिळते, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केले. तसेच आषाढी वारीमध्ये मृत्यू झालेल्या नाशिक जिल्ह्यातील 6 वारकऱ्यांच्या वारसाना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपये मदत देण्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. 

सिन्नर तालुक्यातील श्री क्षेत्र पंचाळे येथे आयोजित श्री संत सद्‌गुरू योगिराज गंगागिरीजी महाराज 177 व्या अखंड हरिनाम सप्ताहास मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी ग्रामविकास व पंचायत राज, पर्यटन मंत्री गिरीश महाजन, खासदार राजाभाऊ वाजे, आमदार माणिकराव कोकाटे, महंत गुरूवर्य रामगिरीजी महाराज, प्रा. रमेश बोरनारे, शिवाजी तळेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

10 ऑगस्टपासून हा सप्ताह सुरू असून उद्या काल्याचा दिवस आहे. अखंड नामस्मरणाने वातावरणात प्रसन्नता आहे. हरिनाम सप्ताहाची परंपरा 177 वर्षे सुरू ठेवल्याबद्दल अभिनंदन करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, अखंड हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून माणूस धावपळीच्या युगात थोडा काळ हरिनामात तल्लीन होतो. त्यामुळे भक्त वारकऱ्यांना सोयी सुविधा मिळाव्यात ही मुख्यमंत्री म्हणून आपली जबाबदारी आहे. आषाढी कार्तिकीसाठी पंढरपूरमध्ये येणाऱ्या वारकऱ्यांसाठी सुविधा उपलब्ध करुन दिल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच, उपस्थित टाळकरी, माळकरी यांना वंदन करुन आपण माझ्यासाठी विठ्ठलरूप आहात, असे ते म्हणाले.

संतांच्या आशीर्वादाने चांगले काम करण्याची उर्मी मिळते, असे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना मोफत तीर्थक्षेत्र यात्रा करता यावी यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्यात आली आहे. तसेच वारीमध्ये सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांसाठी विठ्ठल रखुमाई वारकरी विमा छत्र योजनाही शासनाने सुरू केली आहे, असे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, हे शासन सर्वसामान्यांचे आहे. त्यांच्यासाठी अनेक योजना शासनाने सुरु केल्या आहेत. माता भगिनींना न्याय देण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली असून आतापर्यंत 80 लाख भगिनींच्या खात्यात पैसे जमा आहेत. उर्वरित महिलांच्या खात्यातही रक्कम जमा होतील. ही योजना बंद होणार नाही, याची तरतूद केल्याचे सांगून त्यांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरु करणारे महाराष्ट्र पहिले राज्य असल्याचे सांगितले. तसेच, लेक लाडकी लखपती योजना, ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना, मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना, मुलींना मोफत व्यावसायिक शिक्षण योजना, आनंदाचा शिधा अशा विविध योजना राज्य शासनाने सुरु केल्या आहेत, असे ते म्हणाले.

पर्यटन मंत्री गिरीश महाजन म्हणाले, महाराष्ट्रातील सर्वात मोठा हरिनाम सप्ताह इथे सुरू आहे. लाखो वारकरी संप्रदायातील भाविक येथे भवरूपी कीर्तनाचा लाभ घेण्यासाठी येथे उन्हाची तमा न करता उपस्थित आहेत. 177 वर्षापासून सुरू असलेला हा सप्ताह असाच पुढे अखंड सुरू राहणार आहे. वारकऱ्यांना सेवा सुविधा देण्यासाठी दहा कोटींच्या निधीची तरतूद कऱण्यात येत आहे. यापूर्वी सरला बेटला 7.5 कोटींचा निधी वारकऱ्यांच्या मंडपासाठी उपलब्ध करून दिला आहे. बालाजी तीर्थक्षेत्राच्या धर्तीवर पंढरपूर येथे 120 कोटींच्या निधीतून शेड उभारण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

प्रास्ताविक माणिकराव कोकाटे यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.

 

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!