spot_img
spot_img

प्रकाश चित्ते यांनी १ कोटी द्यावेत;न्यायालयाचे आदेश;अनुराधा आदिक यांनी मानहानी प्रकरणी केला होता दावा दाखल

श्रीरामपूर (तालुका प्रतिनिधी):-
छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरणी जनतेमध्ये आपल्याबद्दल अपप्रचार करून बदनामी केल्याप्रकरणी श्रीरामपूरच्या तत्कालीन नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी भाजपचे नेते प्रकाश चित्ते यांच्याविरोधात श्रीरामपूर येथील न्यायालयात मानहानीचा दाखल केला होता. न्यायालयाने या प्रकरणी निकाल देत प्रकाश चित्ते यांनी अनुराधा आदिक यांना १ कोटी रुपये द्यावेत, असे आदेश दिले असल्याची माहिती ऍड तुषार आदिक यांनी दिली आहे.

याबाबत ऍड. तुषार आदिक यांनी माहिती देताना सांगितले की,मा.नगराध्यक्षा आदिक यांनी मे २०२१ मध्ये दाखल केलेल्या दाव्यात म्हटले होते की, शिवजयंतीच्या दिवशी श्रीरामपूर येथील शिवाजी चौकात स्थापन केलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा प्रशासनाने हलविल्याच्या निषेधार्थ, श्री छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा संघर्ष समितीने रविवार दि. ४ एप्रिल २०२१ रोजी ‘ श्रीरामपूर बंद ‘ची हाक दिली होती.वास्तविक शिवाजी महाराजांचा पुतळा शिवाजी चौकात बसवण्याबाबत अंतिम मंजुरीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांचेकडे प्रलंबित आहे. असे असताना काही जणांनी सदर ठिकाणी ३१ मार्च रोजी शिवाजी महाराजांचा पुतळा आणून बसवला होता.त्यामुळे काहीही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासनाने हा पुतळा काढला. त्याच्याशी आपला काहीही संबंध नव्हता.मात्र पुतळ्याची जागा बदलणार असल्याचा खोटा आरोप आपल्यावर करून श्रीरामपूर बंदची हाक देत अपप्रचार करून आपली व आपल्या कुटुंबाची बदनामी केली गेली. पोलीस ठाण्यात निवेदन दिले,रिक्षा फिरवली,इलेक्ट्रॉनिक मीडियाला मुलाखत दिली, पत्रके छापली गेली. यातून प्रकाश चित्ते यांनी आपली बदनामी करण्याचा प्रयत्न केला असे आदिक यांनी म्हटले आहे.

या खटल्याच्या सुनावणीदरम्यान स्वतः अनुराधा आदिक, जगदीश थेटे, तत्कालीन पोलिस निरीक्षक संजय सानप, पालिकेचे कर्मचारी अनंत शेळके, आदिक यांचे स्वीय सहाय्यक अविनाश पोहेकर, प्रभात शिंदे यांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. दोन्ही बाजूचे युक्तीवाद पूर्ण झाल्यानंतर वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधिश विनय कांबळे यांनी चित्ते यांनी आदिक यांची मानहानी केल्याचा निष्कर्ष काढला. तसेच मानाहानीपोटी चित्ते यांनी आदिकांना १ कोटी रूपये देण्याचे आदेश दिला. आदिक यांच्या वतीने अॅड.तुषार आदिक यांनी काम पाहिले. याकामी त्यांना अॅड.सुशिल पांडे, अॅड.वैभव गुगळे यांनी सहाय्य केले.
न्यायालयाने दिलेल्या निकालाचा आदर करते.
– अनुराधा आदिक
——-
न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात वरिष्ठ न्यायालयात अपिल करणार आहे.
– प्रकाश चित्ते
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!