नेवासा (जनता आवाज वृत्तसेवा ):-पोलीस ठाणे नेवासा हद्दीत पाचेगाव शिवारात अनोळखी व्यक्तीचा अज्ञात कारणावरून खून करण्यात आलेला आहे.
आज शुक्रवार दिनांक 16 ऑगस्ट रोजी पाचेगाव येथील शेतकरी कचरू पडोळ आपल्या शेतामध्ये गिनी गवत कापण्या करता 9.00 वाजण्याच्या सुमारास गेला असता त्या ठिकाणी त्याला अंदाजे 35 वर्षे वयाच्या व्यक्तीचे प्रेत रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे आढळून आले. सदरची माहिती त्यांनी स्थानिक पोलीस पाटलांना दिली. स्थानिक नागरिक, पत्रकार व पोलीस पाटलांनी सदरची माहिती पोलिसांना कळवली.
नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय अ. जाधव पोलीस उप निरीक्षक विजय भोंबे, मनोज अहिरे, विकास पाटील हवालदार केदार, पोलीस नाईक गांगुर्डे, पोलीस कॉन्स्टेबल वैद्य, करंजकर, वाघ यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सदर ठिकाणी जाऊन पाहिले असता अंदाजे 30 ते 35 वर्षे वयाच्या पुरुष जातीच्या व्यक्तीच्या गळ्यावर धारदार वस्तूने वार करून गळा कापून खून केल्याचे दिसून आले.
वय:- अंदाजे 35 वर्षे उंची:- 165 से. मी. अंगावर निळी जिन्स पॅन्ट, आकाशी टी शर्ट, माचो कंपनीचे लाल रंगाची अंडर वेअर, लाल रंगाचे बनियन, दोन्ही पायात ग्रे रंगाचे सॉक्स, तपकिरी रंगाचा बेल्ट, उजव्या हाताच्या मनगटात सप्तरंगी दोर आहे, कमरेला लाल रंगाचा करदोडा तसेच सप्तरंगी नाडा, तर्जनीमध्ये अंगठी असून त्यावर महाकाल असे लिहिलेले आहे.
शरीरावरील खुणा उजव्या हातावर महादेवाचे चित्र गोंदलेले असून कालभैरव असे लिहिलेले आहे.
सदर बाबत पुनतगावचे पोलीस पाटील संजय वाकचौरे यांच्या फिर्यादीवरून पोलीस ठाणे नेवासा येथे नवीन कायद्यानुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
नेवासा पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.घटनेच्या ठिकाणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील व अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कल्लूबर्मे यांनी भेट दिली आहे.
प्रेताच्या पंचनामा, उत्तरीय तपासणी करण्यात आलेली आहे.
सदर खुनाबाबत पोलिसांना धागेदोरे मिळाले असून खुन्यापर्यंत पोलीस पोहचतील असा विश्वास पोलीस निरीक्षक धनंजय अ. जाधव यांनी व्यक्त केला आहे.
सदर गुन्ह्याचा तपास मा. पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलिस अधीक्षक वैभव कल्लूबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक धनंजय अ. जाधव करीत आहेत.