लोणी (जनता आवाज वृत्तसेवा):- सहकारी साखर कारखानदारीचे जनक पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांच्या १२४ व्या जयंती दिनानिमित्त देण्यात येणा-या राज्यस्तरीय साहित्य आणि कलागौरव पुरस्कार वितरण सोहळ्यास केंद्रीय आयुष तथा कुटंब कल्याण राज्य मंत्री ना.प्रतापराव जाधव प्रमुख अतिथी म्हणून उपस्थितीत राहणार असून, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष रविंद्र शोभणे यांच्या अध्यक्षतेखाली हा जयंती दिन समारंभ संपन्न होणार असल्याची माहीती डॉ.सुजय विखे पाटील यांनी दिली.
पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधुन दरवर्षी साहित्य आणि कलागौरव पुरस्काराचे वितरण करण्यात येते. प्रवरानगर येथील डॉ.धनंजयराव गाडगीळ सभागासमोरील प्रांगणात सोमवार दि.१९ ऑगस्ट रोजी दुपारी २ .वा. या साहित्य पुरस्कार वितरण सोहळ्यास केंद्रीय आयुष तथा कुटंब कल्याण राज्य मंत्री ना.प्रतापराव जाधव हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून, ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष रविंद्र शोभणे यांच्या अध्यक्षतेखाली हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे. या पुरस्कार वितरण सोहळ्यास महसूल,पशुसंवर्धन व दूग्ध व्यवसाय विकास मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील, माजीमंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील, प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ.राजेंद्र विखे पाटील, पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष डॉ.रावसाहेब कसबे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी तसेच साहित्यप्रेमी उपस्थित राहणार असल्याचे डॉ.सुजय विखे पाटील म्हणाले.
यावर्षी मुंबई येथील जेष्ठ साहित्यीक आणि विचारवंत प्रेमानंद गज्वी यांना जीवनगौरव पुरस्कार, कानपुर येथील समिर चव्हाण यांच्या ‘अखई ते जाले या ग्रंथास उत्कृष्ठ साहित्य पुरस्कार, नागपुर येथील प्रफुल्ल शिलेदार यांच्या ‘हरवलेल्या वस्तुंचे मिथक’ या कविता संग्राहास विशेष साहित्य पुरस्कार, संगमनेर येथील श्रीनिवास हेमाडे यांच्या ‘तत्वभान’ या वैचारिक ग्रंथास अहमदनगर जिल्हा उत्कृष्ठ साहित्य पुरस्कार, नेवासा येथील बाळासाहेब लबडे यांच्या ‘काळ मेकर लाईव्ह’ या कांदबरीस जिल्हा विशेष साहित्य पुरस्कार, कर्जत येथील हसन शेख पाटेवाडीकर यांना कलेच्या सेबेबद्दल पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील कलागौरव पुरस्कार, नाशिक येथील प्राजक्त देशमुख यांना नाट्यसेवा पुरस्काराने सन्मानित करण्याचा निर्णय पुरस्कार निवड समितीने घेतला. या पुरस्कारर्थींचा सन्मान प्रवरा परिवाराच्या वतीने करण्यात येणार आहे.
या साहित्य पुरस्कार वितरण सोहळ्यास व शेतकरी दिनास शेतकरी, कार्यकर्ते आणि साहित्य प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन प्रवरा परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.