नगर (जनता आवाज वृत्तसेवा):- देशाच्या संरक्षण सेवेत कार्यरत असलेल्या नगर दक्षिण मतदारसंघातील ८ हजार सैनिकांना जिल्हा परिषदेच्या मा. सदस्या राणीताई लंके यांनी राख्या पाठविल्या असून देशाच्या सीमांचे रक्षण करण्यासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या या भावांप्रती राणीताईंसह खा. नीलेश लंके यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.
गेल्या काही वर्षांपासून खा. नीलेश लंके हे समाजकारण, राजकारणात सक्रीय असून नगर जिल्हयासह राज्यात त्यांचा संपर्क आहे. त्यांच्या अर्धांगिनी जि.प. च्या मा. सदस्या राणीताई लंके यांचाही संपर्क दांडगा असून राणीताई म्हणून त्या परिचित आहेत. खा. लंके यांच्या सहकाऱ्यांसह जिल्हयातील, जिल्हयाबाहेरील लंके यांच्या चाहत्यांसाठी राणीताईंचे नाते बहिणीप्रमाणे आहे. याच नात्याची जाण ठेऊन राणीताई यांनी देशाच्या सीमेवर असलेल्या भावांसाठी पोष्टाद्वारे राख्या पाठवून बहिण भावाच्या पवित्र नात्याला उजाळा दिला आहे.