11.7 C
New York
Sunday, November 24, 2024

Buy now

spot_img
spot_img

सहकार महर्षी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या १२४ व्या जयंतीनिमित्त विशेष लेख  (  प्रो. डॉ. शांताराम बबनराव चौधरी ) 

सहकार पंढरीचे पांडुरंग- पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील  

शोषितांच्या आत्मिक उत्पन्नाचे लोक चळवळ उभे करणारे आणि ब्रिटिश राजवट व सावकारशाहीच्या घट्ट विळख्यात अडकलेला ग्रामीण समाज दु:खमुक्त करण्याच्या ध्येयाने पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांनी १९५० ला सहकारी साखर कारखानदारी जन्माला घातली. त्यातून राज्यात-देशात आणि जगातील अनेक राष्ट्रात परीवर्तनाचे नवे पर्व सुरू झाले.

महाराष्ट्रतील सहकारी साखर कारखानदारीचे आद्य प्रवर्तक. अहमदनगर जिल्ह्यातील लोणी बुद्रुक या खेड्यात एका शेतकरी कुटुंबात जन्माला आलेल्या व फक्त चौथीपर्यंतचे शिक्षण घेऊन; लहान वयातच शेतीला सुरुवात करणाऱ्या विठ्ठलराव विखे पाटील यांनी त्याकाळी शेतकऱ्यांच्या जमिनी कर्जबाजारीपणामुळे सावकारांच्या घशात गेल्यामुळे ते कंगाल बनले होते, हे नेमके हेरून त्यांनी व्हवहारबुद्धी, चातुर्य व काटकसरीने शेती केली. १९२३ मध्ये ‘लोणी बुद्रुक सहकारी पतपेढी’ ची स्थापना करून; ते सार्वजनिक जीवनातील सहकारी क्षेत्राकडे वळले. त्यांनी जिल्ह्यात सहकारी संस्थांचे जाळे निर्माण केले, तसेच गावातील पाथरवट-वडार मंडळींना एकत्र आणून ‘मजूर सहकारी सोसायटी’ची स्थापना केली.

इंग्रज सरकारने मुंबई कौन्सिलमध्ये ‘तुकडे बंदी आणि तुकडे जोड’ हे विधेयक आणले, या विधेयकामुळे शेतकऱ्यांच्या जमिनीचे तुकडे सावकाऱ्यांच्या घशात जाऊन ते जमिनीला मुकणार होते. अशा वेळी इस्लामपूर येथे शाहू महाराजांनी घेतलेल्या शेतकरी परिषदेला विखे−पाटील नगर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांसह गेले व तेथे हजारो शेतकऱ्यापुढे भाषण देऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली. त्यातूनच त्यांच्या शेतकरी नेतृत्वाचा जन्म झाला. पुढे महाराष्ट्राच्या एक लाख शेतकऱ्यांनी याच प्रश्नासाठी पुण्याच्या कौन्सिल हॉलला वेढा घातला, त्यात विखे−पाटील आघाडीवर, त्यात विखे−पाटील आघाडीवर होते. त्यांनी शेतकऱ्यांना त्यांच्या दैन्यावस्थेची जाणीव करून देऊन, संघटित होण्याचे व त्यातून व्यक्तिगत व सामुदायिक विकास साधण्याचे महत्त्व पटवून दिले. विखे−पाटील यांच्यावर सत्यशोधक चळवळीचा व डाव्या विचारसरणीचा प्रभाव होता.

सहकारी चळवळीत देशात महाराष्ट्र अग्रेसर असून अहमदनगर जिल्हा राज्यात अग्रेसर आहे. भारतातील पहिला सहकारी साखर कारखाना पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्या प्रयत्नांमुळे प्रवरानगर , लोणी येथे उभा राहिला. हा कारखाना आता ‘पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना’ म्हणूनच ओळखला जातो. सहकारी तत्त्वावरील सर्वाधिक साखर कारखाने राज्यात याच जिल्ह्यात आहेत. आशिया खंडातील पहिल्या सहकारी साखर कारखान्याची मुहूर्तमेढ पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांनी नगर जिल्ह्यातील प्रवरानगर येथे 1950 मध्ये रोवली. त्या वेळी देशाला नुकतेच स्वातंत्र्य मिळाले होते, म्हणून शेतकऱ्यांच्या मालकीचा साखर कारखाना निर्माण होणे ही घटना भारतीय शेती, शेतकरी आणि उद्योग जगताला नवी प्रेरणा देणारी ठरली. कै. धनंजयराव गाडगीळ, कै. वैकुंठभाई मेहता यांच्या बहुमोल मदतीने पद्मश्री विखे पाटील यांनी खऱ्या अर्थाने कष्टकरी शेतकऱ्याला आर्थिक स्वायत्तता मिळवून दिली. नंतरच्या काळात या सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मुलांसाठी शिक्षण संस्था, आरोग्यासाठी रुग्णालय, बॅंक अशा विविध संस्थांची स्थापना केली. त्यांचे हे कार्य राज्यातील शेतकऱ्यांसाठी दीपस्तंभच ठरले. सहकारी तत्त्वावरील हा “प्रवरा पॅटर्न’ राबविला गेला. त्यामुळे सहकाराच्या माध्यमातून राज्य आणि देशाच्या विकासास मोठा हातभार लागला.  देशातील सहकारी चळवळीसाठी मोलाचे योगदान देणाऱ्या मान्यवरांच्या चरित्रातून ग्रामीण शेतकरी समाजाला नवी दृष्टी मिळत असते. सहकारमहर्षी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांनी सहकाराच्या माध्यमातून नवचैतन्य फुलविले. त्यांच्या कार्याची प्रेरणा पुढच्या पिढीला मिळत राहील, यात शंका नाही.

शेती, सहकार आणि उद्योग या क्षेत्रांत नवनवीन परंपरा निर्माण करणाऱ्या पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटलांनी सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून अनेक नवनवीन योजना राबविल्या. या योजनांद्वारा कारखाना कार्यक्षेत्रातील लोकांच्या आर्थिक व सामाजिक जीवनात लक्षणीय सुधारणा झाली. उपसा सिंचन योजना, पाझर तलाव, नदीवरील बंधारे याशिवाय अनेक छोट्या सिंचनाचा लाभ शेतकऱ्यांना मिळवून दिला. परिसरात फिरताना विखे पाटील शेतकऱ्यांच्या शेतावर किंवा घरी जाऊन शेतीसंबंधी सूचना करीत. चोपण जमिनीतून चर काढले तर पाण्याचा निचरा होईल, जमीन सुपीक बनेल आणि उसाचे एकरी उत्पादन वाढेल, यासाठी ते शेतकऱ्यांमध्ये सतत जागृती करीत. ऊस पिकविणाऱ्या शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती साधायची असेल तर त्याच्या उत्पादनात वाढ होणे गरजेचे आहे. “शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी’ या उक्तीप्रमाणे ज्या उसाची लागवड करायची, त्याचे बेणे सकस आणि उत्तम असले पाहिजे. पद्मश्री विखे पाटील कारखाना सदस्यापासून गट कमिटीच्या सदस्यांच्या बैठकी घेऊन चांगल्या बेण्याचा पुरवठा करता यावा यासाठी कारखान्याच्या मालकीचे सीड फार्म तयार केले.

प्रत्येक शेतकरी हा स्वतःच एक विद्यापीठ बनू शकेल. मात्र त्याला गरज आहे ती योग्य मार्गदर्शनाची आणि त्यांच्या परिसरातच सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध होण्याची. ही गरज ओळखून पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांनी अतिशय दूरदृष्टीतून शेतकऱ्यांना सहकार चळवळीतून मिळणाऱ्या आर्थिक लाभापुरतेच मर्यादित न ठेवता सहकार चळवळीला आवश्‍यक असणाऱ्या पायाभूत सुविधा आणि साधनांची उपलब्धता होण्याच्या दृष्टीने अनेक प्रकल्प प्रवरा परिसरात राबविले. त्यामुळेच परिसराचा सर्वांगीण विकास साधला गेला. शेतकऱ्यांच्या सहकारी साखर कारखान्यांची योजना विखे−पाटील यांनी यशस्वी रीत्या राबविल्यामुळे भारत सरकारने त्याचा लाभ आणि माहिती भारतातील विविध प्रतिनिधी आणि अभ्यासू शेतकरी यांना व्हावी, म्हणून अखिल भारतीय सहकारी साखर कारखान्यांची पहिली परिषद १९५६ साली प्रवरानगर येथे भरविली. प्रवरानगरचा सहकारी साखर कारखाना व विखे−पाटील हे भारतातील सहकारी चळवळीतील कार्यकर्त्यांचे प्रेरणास्थान बनले. अशा प्रकारचे आणखी कारखाने उभे राहण्यासाठी विखे−पाटील यांनी अनेक शेतकरी नेत्यांनी प्रोत्साहन दिले. उदा., सांगलीचे वसंतदादा पाटील, वारणानगरचे तात्यासाहेब कोरे, पोहेगावचे गणपतराव ओंताडे, राहुरीचे वाबूराब तनपुरे, अकलूजचे शंकरराव मोहिते, पंचगंगेचे रत्नाप्पा कुंभार, परभणीचे शिवाजीराव देशमुख, इत्यादी. भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी स्वतः प्रवरानगरला येऊन विखे-पाटील यांच्या कार्याची प्रशंसा केली (१५ मे १९६१). विखे−पाटील यांनी शेतकऱ्यांना बचतीचे महत्त्वही पटवून दिले. शासनाची अल्पबचत योजना यशस्वी रीत्या राबविल्याबद्दल १९६५ मद्ये भारताचे तत्कालीन अर्थमंत्री टी. टी. कृष्णम्माचारी यांनी खास मानपत्र देऊन गौरविले. त्याचप्रमाणे कुटुंबनियोजनाची योजनाही १९५९ पासून त्यांनी परिसरात राबविली. या योजनेचे फलित म्हणजे, १९७६ साली ऑक्टोंबर महिन्यात प्रवरा हॉस्पिटलमध्ये चार दिवस भरविलेल्या कुटुंबनियोजन शिबिरात ६,२३१ शस्त्रक्रिया यशस्वी रीत्या पूर्ण करण्यात आल्या व त्यातून शस्त्रक्रियांचा जागतिक विक्रम प्रस्थापित झाला. विखे−पाटील यांनी पुढील सामाजिक. शैक्षणिक संस्थांवर विविध नात्यांनी काम केले : प्रवरा शिक्षणोत्तेजक सहकारी पतपेढीचे संस्थापक व अध्यक्ष (१९५३), अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाजाचे अध्यक्ष (१९५३−५६), कोपरगाव व कारेगाव सह. साखर कारख्यान्यांचे सन्मानीय संचालक (१९५४), प्रवरा ग्रामीण शिक्षणसंस्थेचे आद्य प्रवर्तक (१९६४), साखर कामगार हॉस्पिटलचे (श्रीरामपूर) अध्यक्ष (१९६८), अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक (१९५८) व अध्यक्ष (१९६८), गोदावरी विकास मंडळाचे सदस्य (१९७१)

कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शैक्षणिक कार्याने ते प्रभावित झाले व त्यांनी कर्मवीरांना नगर जिल्ह्यात शैक्षणिक संस्था उभारण्यास पाचारण केले. तसेच सर्वतोपरीने साहाय्य केले. विखे−पाटील हे रयत शिक्षण संस्थेचे संचालक व उपाध्यक्ष (१९७८) होते. ग्रामीण भागातील आरोग्याचे प्रश्न सुटावेत; म्हणून त्यांनी ‘प्रवरा मेडिकल ट्रस्ट’ ची स्थापना (१९७४) करून अत्याधुनिक सुविधा असलेले भव्य इस्पितळ लोणीत सुरू केले. त्यांच्या पश्चात् त्यांनी स्थापन केलेल्या विविध संस्थांच्या माध्यमांतून अनेक शिक्षणसंस्था-उदा., वैद्यकीय, दंत, परिचालिका, अभियांत्रिकी, तंत्रनिकेतन (मुलांचे व मुलींचे), औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कला अकादमी तसेच गावोगावी अनेक माध्यमिक विद्यालये इ. संस्था उभ्या राहिल्या.

विखे−पाटील यांनी सहकार, कृषी, औद्योगिक व शैक्षणिक क्षेत्रांत केलेल्या मौलिक कामगिरीबद्दल भारत सरकारने त्यांना १९६१ मध्ये ‘पद्मश्री’ हा किताब दिला, तर पुणे विद्यापीठाने ‘डी. लिट्.’ (१९७८) व राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ (१९७९) या पदव्या प्रदान केल्या.

 

 

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!