कोपरगाव(जनता आवाज वृत्तसेवा ):-आ.अमोल मिटकरी यांच्या वक्तव्याचे तीव्र पडसाद आज कोपरगाव शहर आणि तालुक्यात उमटले असून आज महंत रामगिरिजी महाराज यांच्या शिष्यगणानी शहर पोलिस ठाण्यास घेराव घातला असून वातावरण तणावयुक्त बनले असल्याचे दिसून येत आहे.
श्रीरामपूर तालुक्यातील सरला बेटाचे महंत रामगिरीजी महाराज यांनी श्री क्षेत्र पांचाळे येथील अखंड हरिनाम सप्ताहात मुस्लिम धर्मीयांच्या भावना दुखावणारे वक्तव्य केले असल्याचा आरोप आहे.मोहंमद पैगंबर यांच्यासंबंधी आक्षेपार्ह विधान केल्याचा व्हिडिओ प्रसारित झाला आहे.त्यावरून मुस्लिम सामाजात संताप व्यक्त होत आहे.त्यातच भरीस भर म्हणून आज एका वृत वाहिनीवर अजित पवार गटाचे प्रवक्ते आ.अमोल मिटकरी यांनी महंत रामगिरिजी महाराज यांचेवर वादग्रस्त विधाने केल्याने आगीत तेल ओतले गेले आहे त्याचे पडसाद कोपरगाव तालुक्यात महंत रामगिरिजी
महाराज यांचे शिष्य वर्गात उमटले आहे.त्यातून अनेक भाविकांनी आज कोपरगाव शहर पोलिस ठाण्यास घेराव घालत आ.मिटकरी यांचेवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली व शहर पोलिस ठाण्यास घेराव घातला.
ह.भ.प.परशुराम महाराज अनर्थे,मधुसूदन महाराज,दादा महाराज टुपके आदींसह बहुसंख्येने भाविक भक्त उपस्थित होते.
त्यावेळी पोलीस ठाण्यावर बराच काळ चर्वितचर्वण सुरू होते.मात्र कोपरगाव शहर पोलिस ठाण्याचे नूतन पोलीस निरीक्षक भगवान मथुरे हे गैरहजर होते.त्यावेळी श्रीरामपूर येथे बदली झालेले पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे यांनी परिस्थिती हाताळण्याचे काम करताना दिसत होते.मात्र बराच वेळ उलटूनही त्यांना यश येताना दिसत नव्हते.त्यामुळे त्यांनी आज सहा वाजेच्या सुमारास कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या समोर भजने गात निषेध व्यक्त करण्याचे आंदोलन सुरू केले आहे.
आता या नंतर कोपरगाव शहर पोलिस ठाण्याचे अधिकारी काय भूमिका घेणार याकडे शहर आणि तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागून आहे.
दरम्यान राज्यातील पोलीस विभागाचे अधिकारी या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर एक धोरण राबवताना दिसत नसून एका ठिकाणी एक न्याय तर दुसऱ्या ठिकाणी भलताच न्याय दिसत असून त्यामुळे राज्यातील कायदा सुव्यवस्था धोक्यात येताना दिसत आहे.त्यामुळे यात गृह विभागाने तातडीने बैठक घेऊन एक तर महंत रामगिरीजी महाराज यांचेवरील गुन्हे मागे घेतले पाहिजे किंवा आ.अमोल मिटकरी यांच्या सारख्या वरही तोच न्याय लावला पाहिजे अशी मागणी होत आहे.
दरम्यान नुकत्याच सिन्नर तालुक्यातील पंचाले येथे राष्ट्रवादीचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे एकादशीच्या दिवशी खिचडी फराळाची पंगत दिली असताना दुसरीकडे त्यांच्या गटाचे प्रदेश प्रवक्ते आ.अमोल मिटकरी विरोधात गरळ ओकतात यावर ह.भ.प.परशुराम महाराज अनार्थे यांनी नेमकेपणाने बोट ठेवले आहे.