8.7 C
New York
Thursday, November 21, 2024

Buy now

spot_img
spot_img

५४० कोटीच्‍या प्रकल्‍पामुळे जिल्‍ह्याच्‍या औद्योगिक विकासाला नवा चेहरा मिळणार – ना.राधाकृष्‍ण विखे पाटील

श्रीरामपूर (जनता आवाज वृत्तसेवा ):-जिल्‍ह्यातील युवकांना जिल्‍ह्यातच रोजगार उपलब्‍ध करुन देण्‍याच्‍या संकल्‍पनेला मुर्त स्‍वरुप येत असून, एमआयडीसीतील ५४० कोटी रुपयांच्‍या प्रकल्‍पामुळे जिल्‍ह्याच्‍या औद्योगिक विकासाला नवा चेहरा मिळेल असा विश्‍वास महसूल तथा पालकमंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी व्‍यक्‍त केला. 

तालुक्‍यातील सुमारे एक हजार तरुणांना रोजगार उपलब्‍ध होईल या उद्देशाने एएमबीए कोच बिल्डर प्रायव्हेट लिमिटेड, व्हरबीना व्हीवीएन प्रायव्हेट लिमिटेड आणि एक्स इन्फीनिटी प्रायव्हेट लिमिटेड या तीन कंपन्याचा एकत्रित प्रकल्प औद्योगिक वसाहती मध्ये कार्यान्वित होत आहे. या प्रकल्‍पाचा भूमीपुजन समारंभ महसूल तथा पालकमंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या उपस्थितीत संपन्‍न झाला.

या प्रोजेक्‍टचे चेअरमन सुमनजी रेड्डी, डॉ.सुजय विखे पाटील, डायरेक्‍टर दिलीप आचार्य, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, प्रकल्‍पाचे सीईओ श्रीकांतजी, औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक आधिकारी नितीन गवळी यांच्‍यासह मान्‍यवर उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना मंत्री विखे पाटील म्‍हणाले की, एमआयडीसी मध्‍ये ५४० कोटी रुपयांचा प्रकल्‍प कार्यान्वित होणे ही औद्योगिक विकासाच्‍या दृष्‍टीने महत्‍वपूर्ण बाब आहे. या जिल्‍ह्यातील युवकांच्‍या रोजगार निर्मितीसाठी मागील अडीच वर्षात काम सुरु केल्‍यानंतर प्रत्‍येक तालुक्‍यात उद्योग उभे राहावेत ही भूमिका घेवून आराखडा तयार केला. शिर्डी, नगर, बेलवंडी या ठिेकाणी औद्योगिक वसाहतींना जागेची उपलब्‍धता करुन दिली. आता उद्योजकांशी चर्चा सुरु असून, अनेक उद्योग जिल्‍ह्यामध्‍ये येण्‍यास तयार झाले असून, श्रीरामपूर औद्योगिक वसाहतीत सुरु होणारा प्रकल्‍प सुध्‍दा जिल्‍ह्याच्‍या औद्योगिक विकासाच्‍या दृष्‍टीने मोठी उपलब्‍धी असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

नव्‍याने सुरु होत असलेल्‍या या प्रकल्‍पामुळे तालुक्‍यातील युवकांना रोजगाराची मोठी संधी आहे. या प्रकल्‍पाचा विस्‍तार अधिक होणार असून, या प्रकल्‍पामधून आरामदायी बसची निर्मिती, रेल्‍वेसाठी कोच आणि अत्‍याधूनिक शिपींग कंटेनरचे उत्‍पादन होणार असल्‍याने या प्रकल्‍पाचा विस्‍तार दिवसागणीक वाढत जाईल. येत्‍या वर्षभरात हा प्रकल्‍प कार्यान्वित होण्यासाठी लागणारे सर्व सहकार्य करण्‍याची ग्‍वाही मंत्री विखे पाटील यांनी दिली.

पारनेर तालुक्‍यात ढवळपुरी येथे लोकर उत्‍पादनाचे क्‍लस्‍टर मंजुर झाले असून, यासाठी १० कोटी रुपयांचा निधी उपलब्‍ध करुन दिला आहे. शिर्डी येथील औद्योगिक वसाहतीमध्‍ये येणारा डिफेन्‍स क्‍लस्‍टरचा प्रकल्‍पही मोठी संधी निर्माण करणारा असून, जिल्‍ह्यातीलच भूमिपुत्राचा हा प्रकल्‍प औद्योगिक विकासाच्‍या दृष्‍टीने महत्‍वपूर्ण ठरणार असल्‍याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.

प्रकल्‍पाचे चेअरमन सुमजी रेड्डी यांनी आपल्‍या भाषणात हा प्रकल्‍प नगर जिल्ह्यात कार्यान्वित होत असल्‍याचा मोठा आनंद आम्‍हाला आहे. या प्रकल्‍पातून औद्योगिक वसाहती बरोबरच जिल्‍ह्याचे नावही देशात पोहोचण्‍यास मोठी मदत होईल. लवकरच हा प्रकल्‍प कार्यान्वित करण्‍यासाठी आमचे प्रयत्‍न असतील असे त्‍यांनी आश्‍वासित केले. प्रारंभी या प्रकल्‍पाचे सादरीकरण सीईओ श्रीकांतजी यांनी केले. उद्योग समुहाच्‍या वतीने मंत्री विखे पाटील यांचा संचालक दिलीप आचार्य यांनी सत्‍कार केला. तर जिल्‍ह्याच्‍या वतीने चेअरमन रेड्डी यांना मंत्री विखे पाटील यांनी सन्‍मानि‍त केले.

या कार्यक्रमास दिपक पठारे, नानासाहेब पवार, नानासाहेब शिंदे, मारुती बिंगले, गिरीधर आसणे, नितीन भागडे यांच्‍यासह औद्योगिक वसाहती मधील उद्योजक, सर्व व्‍यापारी उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!