महाराष्ट्र राज्यातील दोन दिगग्ज आजी-माजी महसूलमंत्री हे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकी निमित्ताने एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. नगर जिल्ह्यतील थोरातांचे संगमनेर व विखे पाटलांचे राहाता मतदारसंघात दोघे एकमेकांना शह देत आहेत. अनेक वर्षांपासून संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये आ. बाळासाहेब थोरातांची तर राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीवर आ. व महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची एकहाती सत्ता आहे.
विखे-थोरात पुन्हा आमने सामने !आ.थोरातांचा प्रचाराचा नारळ थेट कोल्हारमध्ये बाजार समिती निवडणूक
कोल्हार (प्रतिनिधी) : बाजार समिती निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा विखे विरुद्ध थोरात असा सामना रंगणार आहे. सातत्याने बिनविरोध होणाऱ्या विखे पाटील आणि थोरात यांच्या मतदार संघातील बाजार समितीत यावेळी निवडणूक होत असून विखे आणि थोरात गट आमने सामने उभे ठाकले आहेत. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांवर केलेली जहरी टिका त्याची प्रचिती नुकत्याच आ. बाळासाहेब थोरात यांच्या कोल्हार येथील प्रचाराच्या सभेत दिसली.
२०१९ पूर्वी हे दोन्ही नेते काँग्रेस मध्ये होते. त्यामुळे दोघांपैकी कुणीही एकमेकांविरोधात लढले नाहीत. मात्र आता विखे पाटील भाजप मध्ये तर आ. थोरात काँग्रेस मध्ये असल्याने दोघेही एकमेकांच्या मतदार संघातील संस्था काबीज करण्याचा प्रयत्न करणार आहेत. यावेळी झालेल्या ग्रामपंचायत निडणुकीत हे चित्र समोर आले होते. त्यामुळे आता होत असलेल्या कृषी उत्पन बाजार समितीच्या निवडणुकीत दोन्ही नेते एकमेकांना शह कटशह देणार हे निश्चित आहे.
बाजार समिती निवडणुकीचा बिगुल वाजताच आ. बाळासाहेबांनी प्रचाराचा नारळच विखेंच्या होम पिचवर येऊन फोडत विखे पाटलांवर तोफ डागली. नगर मनमाड रस्त्याची कु-प्रसिध्दी, बाजारपेठ, गांवचा विकास, दहशतीचे राजकारण तसेच महाविकास आघाडी पुरस्कृत शेतकरी परीवर्तन मंडळाचा पॅनल होऊ नये म्हणून प्रयत्न यासोबत शेतकरी विरोधी सरकार आशा विविध शब्दांच्या कोटी करीत माजी महसूल मंत्री आ.बाळासाहेब थोरात यांनी महसुल मंत्री राधाकृष्ण विखे यांचेवर आरोप केले.
अद्याप कोल्हार भगवतीपुर मध्ये विखे पाटलांची सभा झालेली नाही. त्यामुळे होणाऱ्या सभेत विखे पाटील आ.थोरातांना काय उत्तर देणार हे पाहणे औसुक्याचे ठरेल. तूर्तास बाजार समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने हे दोन्ही आजी-माजी महसूल मंत्र्यांमधील सामना रंगतदार होणार की दोन्ही नेते आपापला गड राखणार हे निवडणूक निकालानंतर समोर येणार आहे.