पाथर्डी ( जनता आवाज वृत्तसेवा): — राज्याचे माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अँड प्रतापराव ढाकणे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवार दिनांक 23 ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता पाथर्डी तहसील कार्यालयावर भव्य शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात आला.या मोर्चामध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्ष,शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष तसेच राष्ट्रीय काँग्रेस पक्ष या महाविकास आघाडीचे पदाधिकारी,कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
आमदार तनपुरे व ढाकणे यांनी शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या ज्यामध्ये रब्बी व खरीप हंगाम 2023 च्या मंजूर पीक विम्याची रक्कम मिळावी,प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना व मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेचे ठिंबकचे रखडलेले अनुदान मिळावे,कृषी यांत्रिकीकरण योजनेचे थकीत अनुदान शेतकऱ्यांना मिळावे.
महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजनेतील नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान देण्यात यावे.या प्रमुख मागण्याकरिता आमदार तनपुरे व अँड ढाकणे यांचे नेतृत्वाखाली हजारो शेतकऱ्यांचा शेतकरी आक्रोश मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला.यावेळी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.तर आमदार प्राजक्त तनपुरे व प्रताप ढाकणे यांनी या शेतकरी आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून महायुती सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले.
याप्रसंगी राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष शिवशंकर राजळे,बंडू पाटील बोरुडे,अमोल वाघ,गहिनीनाथ शिरसाट,महिला जिल्हाध्यक्ष योगिता राजळे,तालुका अध्यक्ष सविता भापकर आदीसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.तहसीलदार उद्धव नाईक,तालुका कृषी अधिकारी सुधीर शिंदे,पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना विविध प्रश्नावर मोर्चेकरांना सामोरे जावे लागेल.मोर्चेची सुरुवात संस्कार भवन पासून करण्यात आली.वाजत गाजत हा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला मोर्चाचे रूपांतर सभेत झाले.त्यानंतर निवेदन देऊन हा मोर्चा विसर्जित करण्यात आला.