संगमनेर (जनता आवाज वृत्तसेवा):–बदलापूर येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या घृणास्पद अत्याचाराच्या निषेधार्थ संगमनेर मध्ये काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीच्या वतीने तोंडाला काळी पट्टी व काळे झेंडे घेऊन या घटनेचा निषेध करत भव्य जन आंदोलन झाले .यावेळी राज्यात बालिका व महिला सुरक्षित नसून सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही तसेच कायदा सुव्यवस्था ढासाळलेल्या महाराष्ट्रात तातडीने राष्ट्रपती राजवट लागू करा अशी मागणी विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.
संगमनेर बसस्थानकावर काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ,राष्ट्रवादी शरद पवार गट, आरपीआय व पुरोगामी संघटनांच्या वतीने बदलापूर घटनेच्या निषेधार्थ भव्य जन आंदोलन झाले यावेळी काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात ,मा.आ डॉ सुधीर तांबे, सौ दुर्गाताई तांबे ,युवक काँग्रेस अध्यक्ष डॉ जयश्रीताई थोरात, बाबासाहेब ओहोळ, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मिलिंद कानवडे शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, ॲड माधवराव कानवडे, शिवसेनेचे अमर कातारी, संजय फड, आप्पा कैसेकर, कैलास वाकचौरे, अशोक सातपुते, दिलीपराव पुंड, इसाकखान पठाण, निखिल पापडेजा, सुरेश थोरात, यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस ,शिवसेना या पक्षांचे कार्यकर्ते ,पदाधिकारी व युवक काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मुक जनआंदोलनानंतर माध्यमांच्या प्रतिनिधीशी बोलताना आमदार थोरात म्हणाले की, बदलापूरची झालेली घटना ही अत्यंत लांचनास्पद आहे. या घटनेतील गुन्हेगाराची पार्श्वभूमी ही वाईट होती. संस्थाचालकांनी हे प्रकरण दाबून टाकण्याचा प्रयत्न केला .त्याला पोलिसांची साथ मिळाली. मंत्रालयामधून दबाव होता की काय असे महाराष्ट्राला वाटत आहे.
लाडकी बहीण योजना सर्वत्र सुरू आहे. मंत्रिमंडळ बहिणीकडून राख्या बांधून फोटोसेशन करत आहे. मात्र या बहिणीचे रक्षण करण्यास सरकार अपयशी ठरले आहे. राज्यात बालिका व महिला असुरक्षित असून बेकायदेशीररित्या गठीत झालेले हे खोके सरकार सत्तेवर राहण्याच्या लायक नाही.
मागील आठ दिवसांमध्ये महिलांवरील अत्याचाराच्या खूप घटना घडल्या आहेत. प्रशासनाचा धाक राहिला नाही .मंत्रालयात सर्व फक्त टक्केवारीत गुंतले आहेत. गुन्हेगारांवर धाक राहिला नाही .महिलांची अब्रू सुरक्षित नाही.बदलापूर मध्ये जनता एकत्र येऊन निदर्शने करत होती सत्ताधारी मात्र त्याला राजकीय हेतू म्हणतात ही चूक आहे. न्यायालयाचा मान राखत आम्ही मूक आंदोलन केले यालाही आता राजकीय हेतू म्हटला जात आहे खरे तर हे सरकारच दुर्दैवी राजकारण करत आहे.
आपण चाळीस वर्षे राज्याच्या राजकारणात आहोत. मात्र इतके वाईट राजकारण कधीही पाहिले नाही. खोके आणि दहशतीमुळे चुकीच्या पद्धतीने हे सरकार सत्तेवर आले होते .जनतेमध्ये या सरकारविरुद्ध मोठा रोष आहे. महाविकास आघाडीला सर्वत्र मोठा पाठिंबा मिळत आहे.
राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर आरोप करणे अत्यंत चुकीचे व बालिशपणाचे आहे. पवार साहेब एक मोठी शक्ती महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासात त्यांचे योगदान आहे. ओके आणि फोडाफोडीतून अनेक जण त्यांना सोडून गेले. मात्र त्यांनी महाराष्ट्र पिंजून काढत पुन्हा पक्ष उभा केला आहे.
राज्यात कायदा सुव्यवस्था ढासळली असून अनागोंदी वाढली आहे. महिला व बालिका असुरक्षित असल्याने या सरकारने तातडीने सत्तेवरून पायउतार व्हावे किंवा केंद्र सरकारने राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली असून बदलापूर घटनेचा व महिला वरील अत्याचाराचा तीव्र निषेध केला आहे.
यावेळी संगमनेर शहर व तालुक्यातील महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी युवक, महिला व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



