मुंबई ( जनता आवाज वृत्तसेवा ) :- राज्य आरोग्य हमी सोसायटी यांच्या अंतर्गत सुरू असलेल्या एकत्रित आयुष्यमान भारत योजना व महात्मा ज्योतिराव फुले योजनेअंतर्गत काम करणाऱ्या आरोग्यमित्रांचे सिटू संलग्न संघटनेमार्फत 23 ऑगस्ट रोजी वरळी येथील जीवनदायी भावनासमोर धरणे आंदोलन होणार होते.
परंतु हे आंदोलन होण्यापूर्वीच राज्य आरोग्य हमी सोसायटीने आरोग्यमित्र संघटनेचे अध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांना मेल पाठवून आम्ही चर्चेस तयार आहोत. तुम्ही 22 ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजता राज्य आरोग्य हमी सोसायटी भावनात हजर राहावे असा मेल केला होता. परंतु डॉ. डी .एल .कराड यांनी सांगितले की, आमची 23 ऑगस्ट ची संपूर्ण तयारी झालेली आहे. आम्ही सर्वजण 23 ऑगस्टला चर्चेस येतो असे सांगितले. 23 ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्रातून सुमारे 500 ते 700 आरोग्यमित्र वरळी येथील सिटू भावनांमध्ये दाखल झाले.
संघटनेचे अध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांनी आरोग्यमित्रांना मार्गदर्शन केले. 36 जिल्ह्यापैकी प्रातिनिधिक स्वरूपात दहा आरोग्यमित्र सोबत घेऊन राज्य आरोग्य हमी सोसायटी येथे गेले. या बैठकीमध्ये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचे सीईओ रमेश चव्हाण, युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीचे प्रतिनिधी, एमडी इंडिया, मेडी असिस्ट, प्यारामाउंट व हेल्थ इंडिया या चारही टीपीए कंपनीचे प्रोजेक्ट हेड यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीमध्ये आरोग्यमित्राच्या पगार वाढ, हक्काची रजा, वार्षिक पगारवाढ याची चर्चा झाली.
तसेच आरोग्यमित्रांची जिल्हा बाहेर बदली होणार नाही. याची चर्चा झाली. कामावरून कमी केलेले नाशिक येथील गणेश शिंदे आणि धुळे येथील रमेश बैसाणे या दोन आरोग्यमित्रांना पुन्हा कामावर रुजू करून घेण्याची मागणी करण्यात आली. सर्व चर्चा सकारात्मक होऊन राज्य आरोग्य हमी सोसायटीचे सीईओ रमेश चव्हाण यांनी आचारसंहितेपूर्वी आरोग्यमित्राच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. तसेच कामावरून कमी केलेल्या दोन्ही आरोग्यमित्रांना लवकरच कामावर घेण्याचे आदेश टीपीए कंपनीला दिले.