8.1 C
New York
Sunday, March 16, 2025

Buy now

spot_img
spot_img

तुम्‍ही सहकारात चांगले काम केले म्‍हणता तर निवडणूकीला घाबरता कशाला? -महसूल, पशुसंवर्धन व दूग्‍ध व्‍यवसाय विकास मंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील

संगमनेर दि.२६ (प्रतिनिधी):-चार बाजुनीं भिंती बांधल्‍या म्‍हणजे सहकारी संस्‍थेचा विकास होत नाही. शेतकरी सभासदांच्‍या हिताचे निर्णय घ्‍यावे लागतात. १९ वर्षांच्‍या राहाता बाजार समितीची प्रगती पाहा आणि ६४ वर्षांच्‍या तुमच्‍या बाजार समितीची वाटचाल पाहा. तुम्‍ही सहकारात चांगले काम केले म्‍हणता तर निवडणूकीला घाबरता कशाला? असा सवाल महसूल, पशुसंवर्धन व दूग्‍ध व्‍यवसाय विकास मंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केला.

       संगमनेर कृषि उत्‍पन्‍न बाजार समितीच्‍या संचालक मंडळाच्‍या निवडणूकी निमित्‍ताने कोल्‍हेवाडी येथे जनसेवा मंडळाच्‍या प्रचारार्थ आयोजित करण्‍यात आलेल्‍या मतदार आणि कार्यकर्त्‍यांच्‍या बैठकीत मंत्री विखे पाटील यांनी थोरातांच्‍या टिकेला जोरदार प्रतिउत्‍तर दिले. याप्रसंगी प्रवरा सहकारी बॅंकेचे चेअरमन अशोकराव म्‍हसे, माजी पंचायत समिती सदस्‍य सरुनाथ उंबरकर, गुलाबराव सांगळे, एकनाथ नागरे, भाऊसाहेब ज-हाड, अॅड.रोहीणीताई निघुते, आरपीआयचे तालुका अध्‍यक्ष आशिष शेळके, दिलीप इंगळे, ज्ञानदेव शिंदे, कोल्‍हेवाडीच्‍या सरपंच सौ.सुवर्णा दिघे, रहिमपुरच्‍या सौ.सविता शिंदे, शांताराम शिंदे, राहुल दिघे आदि याप्रसंगी उपस्थित होते.
       आपल्‍या घणाघाती भाषणात मंत्री विखे पाटील म्‍हणाले की, सोईनुसार राजकारण करण्‍याची संगमनेर तालुक्‍याच्‍या नेत्‍यांची सवय आहे. तिकडे राहाता तालुक्‍यात महाविकास आघाडीच्‍या नावाने पॅनल करायचा, इकडे तालुक्‍यात मात्र महाविकास आघाडीच्‍या नेत्‍यांचे फोटोही वापरायचे नाहीत. स्‍वत:च्‍या अस्तित्‍वासाठी सहकाराच्‍या निवडणूकीतून राजकीय पोळी भाजून घेण्‍याचे काम सुरु आहे. आपल्‍या नेत्‍यांनाच तान नाही तरीही ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि राष्‍ट्रवादीचे नेते त्‍यांच्‍या व्‍यासपीठावर जातात याबाबत आश्‍चर्य व्‍यक्‍त करुन, ते म्‍हणाले की, सहकारी संस्‍थाच्‍या निवडणूकीतही सभासद शेतक-यांना वर्षानुवर्षे गृहीत धरुन कारभार झाल्‍यामुळेच सहकारी संस्‍थामध्‍ये सामान्‍य माणसाला न्‍याय मिळू शकला नाही.
       आमचा सहकार किती चांगला असे म्‍हणत स्‍वत:चीच पाठ थोपटून घेण्‍याची पध्‍दत येथे आहे. बाहेर लोकशाहीचे गोडवे गायचे आणि दुसरीकडे मात्र निवडणूका होवू नयेत म्‍हणून विरोधी उमेदवारावर दबाव आणायचा. सहकारात खरच तुम्‍ही चांगले काम केले असेल तर घाबरता कशाला, बाजार समितीतून तुम्‍ही कोणते निर्णय केले हे निवडणूकीच्‍या निमित्‍ताने सांगितले पाहीजे. बाजार समितीने विकास केला असे म्‍हणायचे मात्र बाजार समनापुरच्‍या रस्‍त्‍यावर भरवायचा असा टोला लगावून विखे पाटील म्‍हणाले की, १९ वर्षात राहाता बाजार समितीने प्रगती साध्‍य केली. ६४ वर्षांच्‍या तुमच्‍या बाजार समितीला ही प्रगती साध्‍य का करता आली नाही असा सवालही त्‍यांनी उपस्थित केला.
       कोव्‍हीड संकटात तुम्‍ही तर सरकारमध्‍ये मंत्री होता. बाजार समिती बंद ठेवून शेतक-यांचे आर्थिक नुकसान झाले. राहाता बाजार समिती ही एकमेव सुरु होती. शेतक-यांचा माल खरेदी केला गेला, हमाल मापाडींना किराना किटचे वाटप केले, या संकटाच्‍या काळातील तुमचे एकतरी काम सांगा, तुमचा सहकार फक्‍त दलालांसाठी सुरु असून, आमच्‍याकडे दररोज राज्‍यातून शेतकरी येतात, तुमच्‍याकडे मात्र आठ पंधरा दिवसांनी शेतक-यांना गेट बंद करुन आंदोलन करण्‍याची वेळ येते असल्‍याची टिका मंत्री विखे पाटील यांनी केली.
       याप्रसंगी सरुनाथ उंबरकर यांनीही तालुक्‍यात सुरु असलेल्‍या माफीयागिरीवर जोरदार टिकास्‍त्र सोडले, आरपीआयचे आशिष शेळके यांनी बाजार समितीच्‍या माध्‍यमातून निर्माण झालेल्‍या मक्‍तेदारीला मोडून काढण्‍याचे आवाहन याप्रसंगी केले.
       पंधरा वर्षे मंत्री असूनही जिल्‍ह्यासाठी एक प्रकल्‍पही तुम्‍ही आणू शकला नाहीत, शिंदे फडणवीस सरकारने मात्र या जिल्‍ह्याला पशुवैद्यकीय महाविद्यालय दिले, १० हजार कोटी रुपयांचा मेंढी शेळी सहकार महामंडळाचा प्रकल्‍प दिला ही आमच्‍या प्रयत्‍नांची उपलब्‍धी असल्‍याचे मंत्री विखे पाटील यांनी भाषणात सांगितले.
 
{आमच्‍या घरी रिकाम्‍या गाड्या पाठविण्‍याची वेळ तुमच्‍यावर येणार नाही, तुमचे बांधकाम कुठे सुरु आहे एवढेच सांगा तुम्‍हाला घरपोहोच वाळू आणून देतो. अशा शब्‍दात वाळू धोरणावर टिका करणा-या थोरातांना मंत्री विखे पाटील यांनी प्रतिउत्‍तर दिले.}
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!