लोणी दि.२५ (प्रतिनिधी):-आजच्या मुलांमध्ये आत्मविश्वास आहे. त्यांना योग्य संस्कार देण्याची गरज आहे. उन्हाळी शिबीरातून मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग कायम स्वरूपी करून मुलांनी मोबाईल पासून दूर राहावे, या शिबीरातील उपक्रमांचा उपयोग विद्यार्थाना त्यांचे व्यक्तिमत्व विकसित करण्यासाठी आणि एक सुजाण नागरीक होण्यासाठी निश्चित होईल असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालीनीताई विखे पाटील यांनी केले.
लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था लोणी अंतर्गत प्रवरा कन्या विद्या मंदीर येथे मुलींसाठी आयोजित केलेल्या दहा दिवसीय विशेष उन्हाळी बालसंस्कार शिबिराच्या समारोप प्रसंगी सौ. विखे पाटील बोलत होत्या. यावेळी संस्थेच्या शिक्षण संचालिका सौ. लिलावती सरोदे, प्रवरा कन्या विद्या मंदीरचे प्रभारी प्राचार्य बी.टी.वडीतके, प्रवरा गर्ल्स इंग्लीश मेडीयमच्या प्राचार्या भारती देशमुख, प्राथमिक विभागाच्या प्रा.सिमा बढे, प्रा. विद्या घोरपडे, प्रा. गिरीश सोनार प्रा. सुरेश गोडगे, प्रा. जितेंद्र बोरा, तसेच राज्यभरातून आलेल्या विद्यार्थिनी व त्यांचे पालक उपस्थित होते.
आपल्या मार्गदर्शनात सौ. विखे पाटील म्हणाल्या, मुलींच्या सुरक्षित शिक्षणात प्रवरा ही अव्वल स्थानावर आहे. संस्थेचे अध्यक्ष आणि महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुणवत्ता पूर्ण शिक्षण देत असतांनाच शिक्षणासोबतच २००५ पासून उन्हाळी शिबिरांचे आयोजन करत सुसंस्कृत आणि आदर्श युवा पिढी घडविण्याचे काम होत असल्याचे सांगून आज आजी-आजोबा, आई- वडील यांचा मुलांबरोबर संवाद कमी होत आहे. मुलांमध्ये मोबाईलचा वापर वाढत असतांना सुट्टीचा चांगला उपयोग या शिबीरातून मुलींना झाल्याने त्यांच्या उपजत कला गुणांना संधी मिळाली आहे. भविष्यातही प्रवरा शैक्षणिक संकुल हे आपल्या सोबत सदैव राहील असेही सौ. विखे पाटील म्हणाल्या.
यावेळी सौ.लिलावती सरोदे यांनी शिबिराचा आढावा घेत राज्यातून सहभागी झालेले विद्यार्थी हेच मोठे यश आहे. पालकांच्या मागणीनुसार १ मे २०२३ पासुन नवीन दहा दिवसीय शिबीरही सुरु होणार असल्याचे सांगितले. शिबीरात शिकलेल्या मुलींनी कलागुणांचे प्रदर्शन करताना संस्कृत श्लोक, संगीत वादन, समूह गीत, हस्तकला, नृत्य असे विविध कला गुण सादर करून सर्वाची मने जिंकली. सहभागी मुलींना प्रमाणपत्रांचे वितरण मान्यवरांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्या घोरपडे यांनी तर सुत्रसंचालन सुरेश गोडगे यांनी केले. जितेंद्र बोरा यांनी उपस्थितांचे आभार मानले.
प्रवरेच्या उन्हाळी शिबीरांनी राज्यात आपले वेगळेपण सिध्द केले आहे. विविध उपक्रमांतून मुलींच्या उपजत कला-गुणांबरोबरचं संस्कारक्षम युवा पिढीसाठी ही शिबिरे महत्वपुर्ण ठरली आहेत. यातून आत्मविश्वास मिळाला अशी प्रतिक्रिया सहभागी मुली आणि पालकांनी दिली.