लोणी (जनता आवाज वृत्तसेवा ):-प्रवरा परिसरात धाडसाने उभी राहीलेली विकासाची मंदिरं पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांनी रोवलेल्या बिजाची फळ आहेत. यातून विकासाचा पाया मजबुत झाल्यामुळेच समाजाच्या प्रगतीचा मार्ग सुकर झाला. येणा-या पिढीचाही भविष्यकाळ आपल्याला उज्वल करायचा आहे. यासाठीच कौशल्य विकासा बरोबरच रोजगाराच्या निर्माणा करीता कराव्या लागणा-या प्रत्येक प्रयत्नात आपल्या सर्वांची साथ मोलाची ठरणार असल्याचे प्रतिपादन महसूल मंत्री तथा संस्थेचे चेअरमन ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
लोकनेते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेतील शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचा-यांच्या वतीने आयोजित केलेल्या स्नेह संवाद कार्यक्रमात मंत्री विखे पाटील यांना मानपत्र, सरस्वतीची मुर्ती देवून सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमास वरदविनायक सेवा धामचे प्रमुख ह.भ.प उध्दव महाराज मंडलिक, माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील, कारखान्याचे चेअरमन कैलास तांबे, प्रवरा बॅकेचे व्हा.चेअरमन मच्छिंद्र थेटे, संचालक शांतीनाथ आहेर, शिवाजीराव जोंधळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
आपल्या भाषणात मंत्री विखे पाटील म्हणाले की, विकासाची पायाभरणी करताना प्रवरा परिसराने नेहमीच धाडस दाखविले. त्यामुळेच आशिया खंडातील सहकारी साखर कारखाना, विना अनुदानीत तत्वावरील पहिले महाविद्यालय आणि मणीभाई देसाई यांच्या उपस्थितीत पहिली धवल क्रांती सुरु झाली. हा इतिहास नव्या पिढीने आता माहीत करुन घेतला पाहीले. असे आवाहन करुन, पद्मश्री विखे पाटील पाटील आणि खासदार डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांचा संस्कार आणि विचारांवरच या भागाची वाटचाल होवू शकली. त्या वाटचालीतच माझी जडणघडण झाली. अशा अनेक प्रसंगातून झालेल्या परिणामांमुळेच राजकीय, सामाजिक जीवनात एक कार्यकर्ता म्हणून मी पुढे आलो. पुढे अनेक संधी मिळाल्या. या सर्वांमध्ये तुमच्या सर्वांची मोलाची साथ मिळाली असल्याचे त्यांनी आवर्जुन सांगितले.
राज्यात महसूल मंत्री म्हणून काम करीत असताना राज्याच्या आणि जिल्ह्याच्या हितासाठी महत्वपूर्ण निर्णय करु शकलो. यामध्ये प्रामुख्याने खंडकरी शेतक-यांचा प्रश्न, आकारी पडीत जमीनींचा शंभर वर्षांचा प्रश्न सोडविण्यात आलेले यश हे माझ्या दृष्टीने खुप महत्वपूर्ण बाब ठरली. जिल्ह्याला अहिल्याबाई होळकरांचे नाव देण्याचा निर्णय, नेवासा येथे ज्ञानेश्वर सृष्टीची उभारणी, शिर्डी औद्योगिक वसाहतीच्या माध्यमातून होणारी रोजगार निर्मिती ही सर्वात मोठी उपलब्धी आपल्याला करता आली. याचे मोठे समाधान असल्याचे ना.विखे पाटील म्हणाले.
ह.भ.प उध्दव महाराज मंडलिक यांनी आपल्या भाषणात ना.विखे पाटील यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करुन, या भागातील प्रत्येक विकास प्रक्रीयेशी विचार जोडण्याचे काम झाले असल्याचे त्यांनी सांगितले. दोन पिढ्यांचा वारसा पुढे घेवून जाण्यासाठी विखे पाटील यांचे अविरतपणे सुरु असलेले कष्ट मोलाचे असल्याचे उध्दव महाराज म्हणाले.
माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील यांनी या परिसराच्या जडणघडणीची वाटचाल विषद करुन आज सामाजिक परिस्थिती मोठ्या प्रमाणात बदलत चालली आहे. सामाजिक सुरक्षेचे मोठे प्रश्न एैरणीवर आले आहेत. अशा काळात प्रवरा परिसराने विकासाच्या माध्यमातून निर्माण केलेली सामाजिक सुरक्षितता महत्वपूर्ण असल्याचे सांगितले. याप्रसंगी डॉ.सौ.सारिका रोहमारे, शिवाजी अनर्थे, प्रा.अनिल गीते, प्रा.सौ.शशिकला खेतमाळीस यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाऊसाहेब रनपीसे यांनी केले. प्रा.डॉ.राजेंद्र सलालकर यांनी शब्दाकंन केलेल्या मानपत्राचे वाचन प्रा.सुरेश गोडगे यांनी केले.
नेवासे येथे ज्ञानेश्वर सृष्टीची उभारणी करण्याकरीता राज्य सरकारकडे अर्थसहाय्याचा प्रस्ताव पाठविला आहे. त्याची तरतुदही अर्थसंकल्पात झाल्याने निधीची कमतरता भासणार नाही. मात्र या उपक्रमात वारकरी सांप्रदायाचेही योगदान असावे या करीता उध्दव महाराज मंडलिक यांनी पुढाकार घेवून ज्ञानेश्वर सृष्टीच्या उभारणीसाठी निधी संकल करावे अशी विनंती मंत्री विखे पाटील यांनी केली.



