कोल्हार ( वार्ताहर ) :- कोल्हार भगवतीपूरमध्ये दिवसेंदिवस चोरी, घरफोडी, मोबाईल व दुचाकी चोरी या घटनांमध्ये वाढ होत आहे. या सर्व घटनांचा तातडीने तपास करून छडा लावावा. गुन्हेगारांना कठोर शासन करावे. या मागणीचे निवेदन कोल्हार भगवतीपूर व्यापारी संघटनेच्यावतीने लोणी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक योगेश शिंदे यांना देण्यात आले.
यासंदर्भात कोल्हार पोलिस दूरक्षेत्रामध्ये बैठक झाली. यावेळी कोल्हार बुद्रुकचे माजी सरपंच अॅड. सुरेंद्र खर्डे यांनी गावातील सुरक्षिततेच्या प्रश्नावर ताशेरे ओढत तक्रारीचा पाढा वाचला. ते म्हणाले, या आठवड्यात गावात लागोपाठ दोन चोरीच्या घटना घडल्या. यापूर्वीही येथे दुकानांमध्ये जबरी चोरी, घरफोडी, चेन स्नॅचींग, दुचाकी चोरी, आठवडे बाजारात मोबईल चोरी आदि घटना वारंवार घडल्या आहेत. मात्र त्या कोणत्याही घटनांचा तपास लागलेला नाही. गावात टारगट मुलांचा त्रास वाढला आहे. वेगवेगळ्या टोळ्या तयार झाल्या. कोल्हार भगवतीपूर हे राहाता तालुक्यातील अग्रगण्य बाजारपेठ आणि साडेतीन शक्तीपीठांचे तीर्थक्षेत्र असलेले गाव आहे. असे असतांना येथे सुरक्षिततेच्या बाबतीत ढिलाई नसली पाहिजे. कोल्हारच्या पोलिस चौकीला सदा न कदा कुलूप असते. येथे पोलिस कर्मचारी वाढवावेत ही ग्रामस्थांची अनेक वर्षांपासून मागणी आहे. पोलिसांचा सज्जनांना धाक आणि गुंडांशी मैत्री पाहायला मिळते हे खेदजनक असल्याचे त्यांनी सांगितले.
पोलिस उपनिरीक्षक योगेश शिंदे म्हणाले, पोलिसांकडून चोऱ्यांचे तपासकार्य सुरु आहे. लवकरच छडा लावला जाईल. दुकानदारांनी सीसीटीव्ही कॅमेरे लावणे आवश्यक आहे. त्यामुळे तपासकामी मदत होते. कोल्हार भगवतीपूरमध्ये एकूण ९ एटीएम आहेत. त्याच्या सुरक्षेत आमचा रात्रीचा खूप वेळ जातो. तेथे बँकांनी सुरक्षा कर्मचारी नेमल्यास आम्हाला गावात व इतर ठिकाणी गस्त घालण्यास अधिक वेळ मिळेल. येथील पोलिस चौकीवर अधिक स्टाफ लवकरच उपलब्ध होईल असेही ते म्हणाले.
व्यापारी पतसंस्थेचे अध्यक्ष संजय शिंगवी यांनी प्रास्ताविकमध्ये गावातील सुरक्षिततेच्या मुद्द्यावर प्रश्न मांडले. संपूर्ण गाव सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या कक्षेत येण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. यावेळी पत्रकार संजय कोळसे, सुनील बोरुडे यांची भाषणे झाली.
याप्रसंगी देवालय ट्रस्टचे माजी उपाध्यक्ष सयाजी खर्डे, विश्वस्त संभाजीराव देवकर, उद्योजक अजित कुंकूलोळ, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सुधीर खर्डे, उपाध्यक्ष अनिल बांगरे, अनिल हिरानंदानी, खजिनदार राजेंद्र खर्डे, सचिव अरुण जोशी, पंढरीनाथ खर्डे, महेंद्र कुंकूलोळ, शिवधन पतसंस्थेचे अध्यक्ष अजित मोरे, नितीन कुंकूलोळ, श्रीकांत बेद्रे, जीवन ढाळे, संतोष रांका आदि उपस्थित होते.