पाथरे (जनता आवाज वृत्तसेवा):- ५ सप्टेंबर या दिवशी स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती यांच्या जन्मदिन सर्व भारतामध्ये शिक्षक दिन साजरा केला जातो. राहाता तालुक्यातील पाथरे बु येथील श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षक दिवस हा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
बदलत्या विश्वानुसार आज विविध क्षेत्रांत होणारे परिवर्तन लक्षात घेऊन शिक्षणक्षेत्रातही बदलाचे वारे वाहू लागले आहेत. आज समाजाच्या प्रत्येक घटकाला शिक्षणाचे महत्त्व पटले आहे, तसेच शिक्षणक्षेत्रात जी सात्त्विकता टिकून आहे, त्यामध्ये शिक्षणाच्या प्रसारासाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या अनेक विभूतींचे मोलाचे योगदान आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरीनंतर ‘ग्लोबल एज्युकेशन’ ही नवी संकल्पना अस्तित्वात आली आहे.
शिक्षणातून खऱ्या अर्थाने लोकशाही समजून घेणारे, जबाबदार, संवेदनशील आणि कर्तबगार नागरिक तयार होणे अपेक्षित असते. अध्यापनातून विद्यार्थ्यांची क्षमता व कौशल्ये विकसित व्हावी. तसेच स्वयं अध्ययन करण्याची प्रेरणा व जागरूकता निर्माण झाली पाहिजे .
भविष्यात उत्तम दर्जाचे शिक्षण देऊन सशक्त समाज निर्माण करण्याची जबाबदारी ‘ शिक्षकांची आहे असे प्रतिपादन यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्रा. कैलास पाबळ यांनी केले.
या शिक्षक दिनाचे औचित्य साधून प्रवरा ग्रामीण रुग्णालयाचे दंतचिकित्सा महाविद्यालयाच्या वतीने दंतचिकित्सा शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराच्या माध्यमातून विद्यालयातील सर्व विद्यार्थी व शिक्षक यांची दंतचिकित्सा झाली विद्यालया प्रती असणारी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी विद्यालयाची माजी विद्यार्थिनी श्रीमती प्रतिभा बांडे यांच्या वतीने विद्या व कलेची देवता श्री सरस्वती मातेचे तैलचित्र विद्यालयास सप्रेम भेट दिले. या तैलचित्राच्या अनावरण सोहळा या जयंती सोहळ्याचे मुख्य अतिथी मा पाबळ यांच्या हस्ते पार पडला. शिक्षक दिन या कार्यक्रमाची रूपरेषा विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मदतीने आखली.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती वंदनेने झाली.त्यानंतर विद्यार्थ्यांनी उपस्थित सर्व मान्यवर व शिबिरातील सर्व डॉक्टर्स व त्यांच्या सहकारी यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. विविध वर्गातील विद्यार्थी विद्यार्थिनींनी आपापले भाषणे सादर केली. सर्वात शेवटी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य बारगुजे उपप्राचार्य वाणी आदींसह सर्व शिक्षक- शिक्षिका, विद्यार्थी- विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.