श्रीरामपूर (तालुका प्रतिनिधी) ः येथिल एक सुशिक्षित कुटुंबातील नवविवाहितेवर संशय घेत तिचा छळ करून मारहाण करत तिच्यावर जादूटोण्याचा प्रयोग करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी विवाहितेने येथील न्यायालयात दिलेल्या फिर्यादी दिली. न्यायालयाने तालुका पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर पोलिसांनी विवाहितेच्या पतीसह सासू, सासरे, नणंद व जादूटोणा करणाऱ्या महिलेविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
प्रविण महादेव कुर्हाडे (वय ३०, धंदा सिव्हील इंजिनिअर), महादेव कुर्हाडे (वय ६२, धंदा सेवानिवृत्त), कमल महादेव कुर्हाडे (वय ५८ धंदा घरकाम), प्रियंका महादेव कु-हाडे (वय २८, धंदा शिक्षिका), प्रतिक्षा महादेव कुर्हाडे (वय २४ धंदा नोकरी, सर्व रा.प्रकाशगड हाईटस्, गणेश चौक, अहमदनगर), आशाबाई व इतर ४ ते ५ महिला (रा.मिरजगाव, ता. कर्जत) अशी आरोपींची नावे आहेत.
याप्रकरणी चैताली प्रविण कुर्हाडे या विवाहितीने फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे की, १३ जुलै २०२१ रोजी चैताली व प्रविण यांचा विवाह अशोकनगर (ता.श्रीरामपूर) येथे झाला. त्यानंतर १५ दिवस बर्यापैकी नांदविले. नंतर विवाहितेवर संशय घेत आठच दिवसांत तुझ्या वडिलांनी ८ दिवसातच लग्न लावून दिलेले आहे. आम्ही बाहेर चौकशी केली नाही, तुझे बाहेर काही तरी लफडे असेल म्हणूनच घाईगडबडीत लग्न उरकुन घेतले असे म्हणत त्रास देण्यास सुरुवात केली. ६ सप्टेंबर २०२१ रोजी अमावस्याच्या दिवशी रात्री आठ वाजेदरम्यान तिच्या सासुच्या अंगात वारे आणले.
यावेळी मोठी नणंद सासुला विचारायला लागली की, सांग तुझ्या सुनेचं कोणासोबत लफडे होते, तिचे काय असेल ते मागचे आज सगळ उघड पाड, आम्ही लग्न करुन फार मोठी चूक केलेली आहे. अशाप्रकारे तंत्रमंत्र व बाहेरील जादूटोण्याचा प्रकार सुरु केला. याबाबत चैतालीने तिची मैत्रिणी पुनम हिला घडलेला प्रकाराबाबत सांगत होती. त्यानंतर आईवडिलांनाही हा प्रकार सांगितला. दरम्यान, नणंदेने चैतालीच्या मोबाईलवर तिच बोलत असल्याचे दाखवून तिच्या मैत्रिणींना मेसेज टाकले. मागचे लफडे आहे किंवा काय याबाबत चौकशा करून स्पिकर फोनवर मैत्रिणीला बोलायला लावून सतत संशय घेवून शिवीगाळ सुरू केली. तसेच ‘तुझी लायकी नाही, तू धूळखात झोपडपट्टीत पडली होती’, असे म्हणत सदर विवाहितेला घराबाहेर हुसकून दिले. तेव्हा तिचे वडील राहुरी बसस्टॅन्डवरून तिला घेवून आले.
त्यानंतर सासरच्या लोकांनी गाडी घेण्यासाठी पाच लाख रूपये आणण्याची मागणी केली. मात्र, नातेवाईक व इतर समजूतदार मंडळींच्या बैठकीत सासरच्या मंडळींनी आपली चूक मान्य करत विवाहितेला पुन्हा नांदण्यास नेले. ४ डिसेंबर २०२१ रोजी सदर विवाहितेच्या सासूची मावस बहीण (रा.मिरजगाव, ता.कर्जत) येथे या विवाहितेला सासरची मंडळी घेवून गेली. तेथे अघोरी विद्या जाणणाऱ्या आशाबाई नावाच्या महिलेकडे नेले. या आशाबाईने महिलेने जादूटोणा सुरू केला. यावेळी सासरच्या मंडळींनी सदर विवाहीतेचे हातपाय धरून या महिलेसमोर बसवले.
जादूटोणा करणाऱ्या महिलेने जबरदस्तीने विवाहितेला हळदी, कुंकू आणि कसलीतरी पावडर लावली. तसेच तिच्या तोंडामध्ये कसलातरी उद टाकला, कवटी व हाडावरून सदर उद टाकून अंगात शक्ती आल्यासारखे या महिलेने केले आणि धूर झाल्यानंतर या विवाहीतेला चक्कर आल्यासारखे होऊ लागले. तेव्हा सदर आशाबाईने सासरच्या लोकांना सांगितले की, ‘या मुलीशी लग्न करायचे नव्हते, ही मुलगी अपशकूनी आहे, तुम्ही फार मोठी चूक केली’, असे सांगत विवाहितेच्या पाठीत काठीने मारले. हिला तुमच्या घराबाहेर काढल्याशिवाय पर्याय नाही, असे सांगितले.
याप्रकारामुळे विवाहिता घाबरून गेली, तिने आपल्या माहेरी माळेवाडी (ता.श्रीरामपूर) येथे घरच्या लोकांना सगळा प्रकार सांगितला. सासरचे लोक चारचाकी घेण्यासाठी पाच लाख रूपयांची मागणी करत आहे. मला बेशुद्ध होईपर्यंत मारहाण करीत आहेत. त्यानंतर श्रीरामपूर तालुका पोलिसात लेखी फिर्याद देण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलिसांनी फिर्याद न घेतल्याने सदर महिलेने न्यायालयात फिर्याद दाखल केली.
न्यायालयाच्या आदेशानंतर श्रीरामपूर तालुका पोलिसांत वरील आरोपींविरोधात कौटुंबिक छळ तसेच महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानूष अनिष्ठ व अघोरी प्रथा, जादूटोना यांना प्रतिबंध करण्याबाबत व त्याचे समूळ उच्चाटन करण्याबाबतचा अधिनियम २०१३ चे कलम २ आणि ३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान या प्रकाराने श्रीरामपूर तालुक्यात खळबळ उडाली आहे.