लोणी (जनता आवाज वृत्तसेवा):-झेंडा नृत्य, लेझीम पथक, झांझ आणि ढोल ताशांच्या तालात प्रवरा उद्योग समुहाच्या गणेशाचे जोरदार स्वागत करण्यात आले. यंदाच्या वर्षी सहकारातून संमृध्दी ही संकल्पना घेवून शालेय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सादर केलेले सांस्कृतीक कार्यक्रम या गणेशोत्सवाचे वैशिष्ट्य ठरले आहे. चैतन्यमय वातावरणात महसूल तथा पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत सपत्नीक गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली.
मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून दरवर्षी ‘एक गाव एक गणपती’ हा उपक्रम प्रवरा परिसरात सुरु करण्यात आला आहे. या निमित्ताने दहा दिवस सांस्कृतीक आणि धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर श्रीगणेशाची स्थापना करण्यात आली. यंदाच्या गणेश उत्सवाचे हे ७५ वे वर्ष आहे. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील, कारखान्याचे चेअरमन कैलास तांबे, व्हा.चेअरमन सतिष ससाणे यांच्यासह सर्व संचालक आधिकारी, कर्मचारी आणि उद्योग समुहातील सर्व संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
गणेश उत्सवाचे औचित्य साधून लोकनेते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेतील शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सांस्कृतीत उत्सवाचा शुभारंभ मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला. लेझीम, झांझ आणि ढोल पथक तसेच झेंडा नृत्य सादर करुन, यंदाच्या गणेश उत्सवाची शानदार सुरुवात प्रवरा परिसरात करण्यात आली. शालेय विद्यार्थी आणि विद्यार्थीनींनी सादर केलेले लाठ्या काठ्यांचे खेळ सर्वांचेच आकर्षण ठरले.
‘सहकारातून समृध्दी’ ही संकल्पना घेवून गणेश उत्सवात सर्वांचा सहभाग असावा या उद्देशाने संस्थेच्या मुख्य कार्यकारी आधिकारी डॉ.सुष्मिता विखे पाटील यांच्या पुढाकाराने यंदाच्या वर्षी विद्यार्थ्यांचे सांस्कृतीक कार्यक्रम संपन्न होत आहेत. यामध्ये शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सहभाग उत्साहाने दिसून आला. या सांस्कृतीत कार्यक्रमास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालिनी विखे पाटील, संस्थेचे संचालक शिवाजीराव जोंधळे, भारत घोगरे, माजी नगराध्यक्ष अभय शेळके, नानासाहेब शिंदे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. लोणी खुर्द आणि बुद्रूक मध्ये हे सांस्कृतीक कार्यक्रम सादर करण्यात आले. लोणी बुद्रूक येथील एक गाव एक गणपती उपक्रमाचा प्रारंभही मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. याप्रसंगी शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी वारकरी सांप्रदायाच्या अनुषंगाने टाळ मृदुंगाच्या धर्तीवर केलेले नृत्य लक्षवेधी ठरले.
प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या वाटचालीत शिक्षणा बरोबरच विद्यार्थ्यांना संस्कृती आणि परंपरेचे ज्ञान मिळावे या उद्देशाने सुरु केलेला हा सांस्कृतीक उपक्रम हा गणेश उत्सवाचा आनंद व्दिगुणीत करणारा असल्याची प्रतिक्रीया संस्थेचे चेअरमन तथा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.
राज्याला पुढे घेवून जाण्यासाठी विघ्नहर्त्या गणेशाने आम्हाला आशिर्वादरुपी उर्जा द्यावी, या प्रगतीमध्ये विघ्न आणणा-यांना सद्बुध्दी द्यावी अशी प्रार्थना आपण गणेशाच्या चरणी केली असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. विविध योजना मधून या राज्याच्या प्रगतीचा रथ पुढे जात आहे. यामागे जनसामान्यांचे पाठबळ देखील आहे. त्यामुळेच विकासाच्या प्रगतीचा विश्वास आणि समृध्द महाराष्ट्रासाठी आम्ही काम करीत आहोत.