नगर दि.२१(प्रतिनिधी):-कृषि विज्ञान केंद्राप्रमाणे देशातील पहिल पशु विज्ञान केंद्र सावळीविहीर येथे उभारण्यात येणार असल्याची माहीती महसूल पशुसंवर्धन तथा दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
देशातील पहिले पशु विज्ञान केंद्र सावळीविहीर येथे उभारण्यात येणार-पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील
लम्पि साथ रोगाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचे पथक राज्यामध्ये आले आहे.या पथकाने आज नगर येथे पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जिल्हाधिकारी कार्यालयात भेट घेतली.केंद्रीय पथकाचे प्रमुख विजयकुमार तेवतीया यांना विखे पाटील यांनी लम्पि साथ रोगाच्या पार्श्वभूमीवर राज्यात राबवल्या गेलेल्या उपाय योजनांची माहीती दिली.आता पुन्हा नव्याने काही भागात प्रादुर्भाव आढळून येत असल्याने दुसरी लसीकरण मोहीम सुरू करण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.मात्र केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
यानंतर पत्रकांराशी बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले की, पशुसंवर्धन विभागाच्या वतीने जिल्ह्यात दोन मोठे प्रकल्प सुरू करण्यात येत असून,सावळीविहीर येथे पशुवैद्यकीय महाविद्यालया बरोबरच पशु विज्ञान केंद्राची उभारणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.देशातील पहीले पशुविज्ञान केंद्र हे नगर जिल्ह्य़ात होत असल्याचे त्यांनी सांगितले.
शेळी मेंढी सहकारी महामंडळाचे कार्यालय नगर येथे सुरू होत असून याचे उद्घाटन १ मे रोजी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.ढवळपुरी येथे महामंडळाच्या अंतर्गत असलेल्या संशोधन केंद्राची उभारणी करण्यात येणार असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.
महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेला आम्ही आमच्या कामातून उतर देवू असे एका प्रश्नाच्या उतरात स्पष्ट करून विरोधकांच्या वज्रमूठीला आधीच तडे गेले असल्याने त्यांच्यातील मतभेद आता उघड होवू लागले असल्याचे मंत्री विखे म्हणाले.



