त्यामुळे आज शेती हा व्यवसाय अडचणीत आला असला तरी भविष्यात शेतीलाच अधिक महत्व असणार आहे, त्यामुळे तरुणांनी शेती व्यवसायाला दुय्यम स्थान न देता प्राधान्याने जपावे. मी सिनेमा निर्मिती क्षेत्रात कार्यरत असलो तरीही शेतकरी पुत्र असल्याचा मला नेहमी अभिमानच वाटत राहील असे प्रतिपादन सुप्रसिद्ध दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांनी नेवासा येथे केले.
शेतकरी असल्याचा सदैव अभिमान राहील – दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे
नेवासा फाटा( प्रतिनिधी):-
शेतकरी हा सतत अडचणींचा सामना करत असला तरीही आजच्या काळात शेतकऱ्या इतका सुखी कोणीच नाही. कारण दातृत्वाची भावना फक्त त्याच्याकडेच आहे.
मुळा एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष उदयन गडाख यांच्या संकल्पनेतून श्री ज्ञानेश्वर महाविद्यालयात यशोरंग कलाविष्कार सोहळा पार पडला या सोहळ्याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून कऱ्हाडे उपस्थित होते. यावेळी आगामी TDM या सिनेमाचे मुख्य कलाकार पृथ्वीराज थोरात, कालिंदी निस्ताणे, नाना मोरे, तसेच प्राचार्य डॉ. गोरक्षनाथ कल्हापुरे, उपप्राचार्य डॉ.अरुण घनवट, उपप्राचार्य प्रा.दशरथ आयनर, यश संवाद विभागाचे प्रा.देविदास साळुंके तसेच रंगभूमी स्टुडिओचे कृष्णा बेलगांवकर, विष्णू नाझरकर आणि नेवासा पोलीस स्टेशनचे सहा.पो.निरीक्षक ज्ञानेश्वर थोरात आदी उपस्थित होते.
भाऊराव कऱ्हाडे पुढे म्हणाले, “उदात्त भावनेने दान करण्याची वृत्ती फक्त शेतकऱ्यांतच पहायला मिळते. माझं बालपण आणि अगदी तारुण्यातलाही बहुतांश काळ मी शेती करण्यात खर्च केला. दिग्दर्शक झालो नसतो तर पूर्णवेळ शेतीच करणे पसंत केले असते. त्यामुळे आज फिल्ममेकिंग करत असलो तरी शेतीविषयी तितकीच आत्मियता आहे. माझ्या सिनेमांमधूनदेखील शेती शेतकऱ्यांचं जीवन जास्त दाखविण्याचा प्रयत्न असतो. येत्या २८ एप्रिल रोजी प्रदर्शित होत असलेल्या TDM या सिनेमातून देखील शेतकऱ्याच्या जीवनातील अडचणी आणि दररोज घडणाऱ्या काही हलक्या फुलक्या विनोदांवर भाष्य केले आहे. एक मनोरंजन करणारं प्रोडक्ट म्हणून तुम्हाला तो नक्कीच पसंतीस येईल. या महाविद्यालयातील निसर्गरम्य परिसर, विद्यार्थ्यांचे प्रेम व उत्साह पाहून खूप भारावून गेलो आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करत असलेल्या यश संवाद विभागाचे काम अत्यंत प्रशंसनीय आहे.”
या सिनेमाचा मुख्य नायक पृथ्वीराज म्हणाला, “मी जेमतेम शिकलेला मुलगा आहे. मात्र वाचन चांगलं असल्याने मला कोणतीही अडचण जाणवली नाही.”
कालिंदी ही अभिनेत्री नवीनच असून तिनेही विद्यार्थ्यांशी दिलखुलास संवाद करत दाद मिळविली. कालिंदीच्या “बघतुय एकीकड आणि चालतुय एकीकड होपलेश, पळ तिकड”… या डायलॉगने सर्व विद्यार्थ्याना आपलंस केलं.
यावेळी महाविद्यालयातील यश संवाद विभागातील विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या ‘नेवासकर फिल्म प्रोडक्शन’च्या लोगोचे अनावरण प्रमुख अतिथींच्या हस्ते करण्यात आले. याबरोबरच विद्यार्थ्यांनी बनविलेला ‘सारथी’ हा लघुपट देखील यावेळी प्रदर्शित करण्यात आला.
प्राचार्य डॉ.गोरक्षनाथ कल्हापुरे यांनी पाहुण्यांचे स्वागत व प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन प्रा.देविदास साळुंके यांनी केले.



