कोल्हार (जनता आवाज वृत्तसेवा ):-स्वर्गीय शंकरनाना खर्डे पाटील यांचे सर्वांशी राजकारणविरहित घनिष्ट संबंध होते. कोल्हार भगवतीपूरच्या बाजारपेठेची भरभराट असो अथवा भगवतीदेवी मंदिर उभारणी कार्य असो. त्यांनी सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक, सांस्कृतिक, शेती आदी सर्व क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले. स्व. नानांनी गावासाठी निस्वार्थ सेवा करीत आयुष्यभर ते सामाजिक जीवन जगले असल्याच्या भावना कोल्हार बुद्रुकचे माजी सरपंच ॲड. सुरेंद्र खर्डे पाटील यांनी व्यक्त केल्या.
शंकरनाना खर्डे पाटील यांच्या ८८ व्या जयंतीनिमित्त कोल्हार भगवतीपूर येथील भगवतीमाता मंदिराच्या भक्तनिवासमध्ये रक्तदान शिबिर व मोफत रक्तगट तपासणी शिबिर संपन्न झाले.
याप्रसंगी ॲड. सुरेंद्र खर्डे पाटील यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. कोल्हार मेडिकल असोसिएशन, शंकरनाना खर्डे पाटील सामाजिक सेवा संघटना व साईबाबा रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी रक्तदात्यांच्या संख्येची शंभरी झाली. अर्थात शंभरहून अधिक रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले. तसेच असंख्य नागरिकांनी नेत्रदान फॉर्म भरून दिले. यावेळी गरजवंत गोरगरीब वयोवृध्द भिक्षुक महिलांना साड्या वाटप करण्यात आल्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामनाथ देवकर होते. याप्रसंगी ॲड. सुरेंद्र खर्डे, डी. के. खर्डे, भरत खर्डे, संपत बाळकृष्ण खर्डे, आण्णासाहेब खर्डे, लोणी खुर्दचे सरपंच जनार्धन घोगरे, बाळासाहेब अंभोरे, व्यापारी पतसंस्थेचे अध्यक्ष संजय शिंगवी, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सुधीर खर्डे, श्रीरामपूर जिल्हा दूध संघाचे मा. संचालक अनिल खर्डे, बालरोगतज्ञ डॉ. सुनील खर्डे, शंकरनाना खर्डे पाटील सेवा संघटनेचे अध्यक्ष अजित मोरे, कोल्हार बुद्रुक सोसायटीचे अध्यक्ष अरुण खर्डे, बी. के. खर्डे आदी मान्यवर व्यासपीठावर विराजमान होते.
याप्रसंगी कॉम्रेड सुरेश पानसरे, तुषार बोऱ्हाडे, दत्तात्रय फलटणे यांनी मनोगत व्यक्त केले. पत्रकार संजय कोळसे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.