शिर्डी (जनता आवाज वृत्तसेवा):-अहिल्यानगरच्या औद्योगिक विकासातील अडथळे दुर करण्यासाठी पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे औद्योगिक विकास महामंडळाचे स्वतंत्र प्रादेशिक कार्यालय जिल्ह्यात सुरु झाले आहे. या कार्यालयामुळे उद्योजकांना मोठा दिलासा मिळाला असून, नवीन उद्योगांना तसेच उद्योगाशी संबधित लागणारे सर्व परवाने आता जिल्ह्यातच मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे.
जिल्ह्यातील उद्योजकांना आपल्या विविध कामांसाठी थेट नाशिक येथे प्रादेशिक कार्यालयात जावे लागत होते. त्यातच वेळेत काम न झाल्यास नाशिक येथे प्रादेशिक कार्यालयात उद्योजकांना हेलपाटे मारणे त्रासदायकही झाले होते. जिल्ह्याचा औद्योगिक विकास आराखडा तयार करताना पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्ह्यातील उद्योजकांचे प्रश्न जाणून घेतले. यामध्ये प्रामुख्याने प्रादेशिक कार्यालयाची मोठी समस्या समोर आली होती.
उद्योजकांच्या मागणीची दखल घेवून मंत्री विखे पाटील यांनी अहिल्यानगर येथेच औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक कार्यालय सुरु करण्याबाबत मंत्रालय स्तरावर पाठपुरावा केला होता. राज्य सरकारने आता अहिल्यानगर येथील प्रादेशिक कार्यालयास मंजुरी दिल्याने हे कार्यालय आता सुरुही झाल्याने जिल्ह्यातील नागापूर, सुपा, श्रीरामपूर, पांढरीपुल या चार औद्योगिक वसाहतीं बरोबरच आता नव्याने विकसीत होत असलेल्या शिर्डी आणि श्रीगोंदा येथील नव्या औद्योगिक वसाहती मध्ये येणा-या उद्योजकांनाही विविध परवानग्यांसाठी या नव्या कार्यालयाचा मोठा आधार मिळणार आहे.
नव्याने सुरु झालेल्या या कार्यालयात प्रादेशिक आधिका-यांसह कर्मचा-यांची नियुक्तीही करण्यात आली असून, या कार्यालयामुळे आता नाशिक येथे जाण्याचा उद्योजकांचा त्रास वाचला आहे.
जिल्ह्याच्या औद्योगिक विस्तारासाठी प्रयत्न सुरु आहेत. यासाठी औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक कार्यालय जिल्ह्यातच असावे ही उद्योजकांची मागणी कार्यालय सुरु झाल्याने पुर्ण झाली असून, याचा लाभ औद्योगिक वसाहती मधील उद्योजकांना आणि नव्याने येणा-या उद्योजकांना निश्चितच होईल असा विश्वास पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.




