संगमनेर (जनता आवाज वृत्तसेवा):- महाराष्ट्राच्या राजकारणात स्वच्छ व संयमी प्रतिमा असलेले आमदार बाळासाहेब थोरात यांनी राज्यात कृषी, शिक्षण, प्रशासन, सहकार आणि ग्रामविकास या क्षेत्रात मोठे योगदान दिले असून अत्यंत व्यस्त कार्यक्रमातूनही सांस्कृतिक क्षेत्राची असलेली जाण आणि सर्वांना सोबत पुढे घेऊन जाण्याची पद्धत यामुळे आमदार बाळासाहेब थोरात हे राज्यातील तरुणांसाठी आयकॉन असल्याचे गौरवउद्गार मराठी चित्रपट अभिनेते वैभव मांगले यांनी काढले आहे.
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कारखाना कार्यस्थळावर चित्रपट अभिनेते वैभव मांगले व सिने अभिनेत्री भार्गवी चिरमुले यांनी आमदार थोरात यांची भेट घेतली याप्रसंगी मा. आमदार डॉ. सुधीर तांबे, इंद्रजीत भाऊ थोरात,कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर ,अमृत सांस्कृतिक मंडळाचे रामदास तांबडे, संदीप दिघे ,अशोक कवडे ,नामदेव कहांडळ, राजू बड व संचालक उपस्थित होते.
यावेळी आमदार थोरात यांनी वैभव मांगले व भार्गवी चिरमुले यांचा सत्कार केला यानंतर बोलताना वैभव मांगले म्हणाले की, महाराष्ट्राला सुसंस्कृत राजकारणाची परंपरा आहे आणि ही परंपरा आमदार बाळासाहेब थोरात हे पुढे नेत आहेत. सतत काम करणारा नेता अशी त्यांची ओळख असून ग्रामीण विकासातून त्यांनी संगमनेर तालुका हे विकासाचे मॉडेल बनवले आहे .याचबरोबर राज्याच्या महसूल सारख्या खात्याची जबाबदारी सांभाळताना शिक्षण, कृषी यांचंसह अनेक महत्त्वाची पदे भूषवली. पक्षाव्यतिरिक्त विविध क्षेत्रातील मान्यवरांशी त्यांची मैत्री आहे.
व्यस्त दिनक्रम असतानाही वाचन हा छंद असल्याने सांस्कृतिक क्षेत्राशी त्यांची अत्यंत जवळीक आहे .याचबरोबर विविध घडामोडी आणि अभ्यासपूर्ण माहिती हे राज्यातील मोजक्या नेत्यांचे वैशिष्ट असून यशवंतराव चव्हाण, शरद पवार, विलासराव देशमुख यासारख्या नेत्यांचा वारसा आमदार बाळासाहेब थोरात यांनी जपला आहे.
आजच्या राजकारणात पुरोगामी विचार जपत सर्वांना पुढे घेऊन जाणे अवघड आहे. मात्र तरीही आमदार बाळासाहेब थोरात अत्यंत सचोटीने हे काम सांभाळत आहे.हे अत्यंत कौतुकास्पद असून ते तरुणांसाठी आदर्शवत आहे
तर भार्गवी चिरमुले म्हणाल्या की, संगमनेर हे अहमदनगर जिल्ह्यातील सर्वात चांगले सांस्कृतिक शहर म्हणून नावारूपास आले आहे. संत व कलावंतांचा सन्मान हे संगमनेरचे वैशिष्ट्य असल्याचेही त्या म्हणाल्या.
यावेळी त्यांनी कारखाना दूध संघ यांचा अमृत उद्योग समूहातील संस्थांना भेटी दिल्या.



