कोल्हार ( वार्ताहर ) :- कोल्हार भगवतीपूर येथे जुन्या पेठेततील एका व्यापाऱ्याच्या निवासस्थानी खिडकी व दोन दरवाजे तोडत अज्ञात चोरट्याने सुमारे साडेतीन लाखांची रोख रक्कम लांबविली. सदर घटना १४ तारखेच्या मध्यरात्री संजय आसावा यांचे दाट लोकवस्तीत असलेल्या घरी घडली.
 संजय शामलाल आसावा यांचे  कोल्हार भगवतीपूर येथे  जुन्या पेठेत प्रसाद एजन्सीज या नावाने यांचे शॉप आहे. गुरुवार व शुक्रवार असे दोन दिवसांची जमा रक्कम त्यांनी लेदर हँडबॅग मध्ये बँकेत भरणा करण्यासाठी भरून ठेवली होती. १४ तारखेच्या मध्यरात्री सव्वा एकच्या सुमारास टेरेसवरून प्रवेश करून अज्ञात एका चोरट्यांनी दोन दरवाजे तोडत घरात प्रवेश केला. पैसे भरून ठेवलेली लेदर बॅग चोरट्यांनी लांबविली. मात्र चोरी करण्यापूर्वी तिथे असलेला सीसीटीव्ही केमेरा त्यांनी चेहेरा दिसू नये याकरिता दुसऱ्या बाजूला केला होता.
सकाळी आठ वाजता सदर घटना आसावा कुटुंबाच्या लक्षात आली. घटनेनंतर लोणी पोलीस स्टेशनचे सपोनी युवराज आठरे, पीएसआय योगेश शिंदे तसेच कोल्हार येथील सफौ लबडे, पो.ना.नेहुल, पो.ना. कुसळकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून नगर येथून ठसे तज्ञ, श्वान पथक पाचारण केले. घडलेली चोरी ही पाळत ठेवूनच करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. सदर घटनेचा तपास सपोनी युवराज आठरे यांचे मार्गदशनखाली पीएसआय योगेश शिंदे करीत आहेत.
..चोरटा सीसीटीव्ही केमेरात कैद..!
सदर चोरीच्या घटनेत एक व्यक्ती तोंडाला बांधून दिसत आहे. चोरी करण्यापूर्वी सीसीटीव्ही केमेरा त्याच्या नजरेस पडला. त्याने तो बाजूला सरकवला मात्र तो अज्ञात चोरटा त्यापूर्वीच सीसीटीव्ही केमेरात कैद झाला.




