संगमनेर( जनता आवाज वृत्तसेवा ):– माजी महसूल मंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आ. बाळासाहेब थोरात यांनी सर्व समाजातील घटकांसाठी विकासाच्या योजना राबविल्या हाच विचार कार्यकर्त्यांनीही अमलात आणला सत्तेत असताना सर्व समाजातील घटकांना संधी दिली. त्यांच्या विचारातून खऱ्या अर्थाने राष्ट्रीय एकात्मता वाढीस लागली असल्याची भावना महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून आलेल्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
आ. थोरात यांची काँग्रेस वर्किंग कमिटीच्या सदस्य पदी झालेली निवड व विधिमंडळातील कामगिरीबद्दल उत्कृष्ट संसदपटू हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा यावेळी कारखाना कार्यस्थळावर सत्कार करण्यात आला.
यावेळी आ.थोरात पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, आजच्या समाजातील सामाजिक परिस्थितीवरून प्रत्येकाने आपापल्या जातीच्या धर्माच्या भिंती उभ्या केल्या आहेत. त्यातून जातीय दंगलीचा कसा भडका उडतो हे आपण जाणूनच आहात तेव्हा आपला भारत जर एक संघ ठेवायचा असेल तर जाती धर्माचे टेंभे मिरवण्यापेक्षा राष्ट्रीय एकात्मता वाढीस लागण्यासाठी सर्व समाज घटकांनी प्रयत्न करायला हवेत.
यावेळी विदर्भ पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यातील पदाधिकाऱ्यांनी थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या यशोधन कार्यालयामधून वंचित, आदिवासी, महिला बचत गट अशा सर्व समाज घटकांसाठी करत असलेले कामकाज बघून सर्वजण भारावून गेले. तर कार्यालयीन अधीक्षक पुंजाहरी दिघे यांनी सर्व पाहुण्यांचे स्वागत केले.
या भेटीमध्ये विदर्भातील काँग्रेस नेते विलास मुके, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिव विजय नाळे, सोमराज तेलखाडे, अँड. पुरुषोत्तम सातपुते, प्रा. अनिल डहाके, प्रा. सतीश ढाेके, नगरसेवक विजय निकाळजे, सामाजिक कार्यकर्ते अनिल भोसले, प्रा.बाबा खरात, संजय भोसले, अनिल शिरसाट, दीपक कदम,अँड. प्रसाद सांगळे, आनंद त्रिभुवन, बाळू वैराट, बाळासाहेब गायकवाड, लाजारस केदारी, प्रभाकर चांदेकर आदींसह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून आलेले काँग्रेस पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.