कोल्हार ( वार्ताहर ) :- कोल्हार भगवतीपूर येथे प्रतिवर्षीप्रमाणे याहीवर्षी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यानिमित्ताने संविधान सन्मान फेरी, प्रतिमापूजन आणि व्याख्यानाचा कार्यक्रम संपन्न झाला.
कोल्हार भगवतीपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्ताने सकाळी गावातून संविधान सन्मान फेरी काढण्यात आली. यामध्ये महिला – पुरुष, तरुण वर्ग मोठ्या संख्येने सहभागी होते. यानंतर कोल्हार बस स्थानकाच्या आवारामध्ये डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी कोल्हार बुद्रुकचे माजी सरपंच ॲड. सुरेंद्र खर्डे, भगवतीपूरचे सरपंच दत्तात्रय राजभोज, उपसरपंच प्रकाश खर्डे, माजी उपसरपंच ज्ञानेश्वर खर्डे, विखे कारखान्याचे संचालक स्वप्नील निबे, ग्रामविकास अधिकारी शशिकांत चौरे, पंढरीनाथ खर्डे, दिलीप बोरुडे, गोरक्षनाथ खर्डे, संतोष लोखंडे, शाम गोसावी, सुरेश पानसरे, वसंतराव मोरे, धनंजय लोखंडे, काळूराम बोरुडे, सुनील बोरुडे, राजेंद्र लोखंडे, दगडू बोरुडे आदी उपस्थित होते.
याप्रसंगी ॲड. सुरेंद्र खर्डे म्हणाले, संविधानामुळे आपल्याला सर्व क्षेत्रात मूलभूत हक्क व अधिकार प्राप्त झाले. ही किमया केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळे शक्य झाली. डॉ. आंबेडकरांनी सर्व क्षेत्रात कार्य करीत आपला वेगळा ठसा उमटविला असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रमुख वक्ते निकलस भोसले म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे देशाला लाभलेली मोठी देणगी आहे. संविधान निर्माण करून त्यांनी नागरिकांना अधिकार प्राप्त करून करून दिल्याचे सांगत त्यांनी डॉ. आंबेडकरांचे जीवनकार्य मांडले.
यावेळी महिला दिनानिमित्त घेतलेल्या स्पर्धांचे बक्षीस वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण लोखंडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष मनोज लोखंडे तसेच सर्व भिमप्रेमी कार्यकर्ते प्रयत्नशील होते.