कोल्हार भगवतीपूर हे राहाता तालुक्यातील नगर-मनमाड महामार्गावरील मोठ्या लोकसंख्येचे (अंदाजे ४०,०००) गाव आहे. गावामध्ये सध्या प्राथमिक आरोग्य केंद्र असून त्या आरोग्य केंद्राची सेवा गावच्या लोकसंख्येच्या दृष्टीकोनाने अपुरी पडत आहे. तसेच गावामध्ये ग्रामीण रुग्णालय मंजूर झाल्यास महिलांकरिता स्त्रीरोग तज्ञ व लहान मुलांकरिता बालरोगतज्ञ या सुविधा गावामध्ये २४ तास उपलब्ध होतील व गावातील नागरीकांसाठी मोफत उपचार उपलब्ध होऊन उपचारासाठी बाहेरगावी जाण्याची गरज भासणार नाही.
कोल्हार भगवतीपूर येथे ग्रामीण रुग्णालयाची मागणी
कोल्हार ( वार्ताहर ) :- कोल्हार बुद्रुक आणि भगवतीपूर ही दोन्ही गावे मोठ्या लोकसंख्येची असून या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय होणे अत्यावश्यक आहे. यासंदर्भात येथील पदाधिकारी व ग्रामस्थांनी ग्रामीण रुग्णालयाच्या मागणीचे निवेदन राज्याचे महसुल, पशुसंवर्धन व दुग्धजन्य पदार्थ विकास तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांना दिले.
या अनुषंगाने येथे ग्रामीण रुग्णालयास मान्यता प्राप्त व्हावी अशी मागणी माजी जि. प. सदस्य डॉ. भास्करराव खर्डे, देवालय ट्रस्टचे माजी उपाध्यक्ष सयाजी खर्डे, विखे पाटील कारखान्याचे संचालक दत्तात्रय खर्डे, धनंजय दळे, सौ. संगिता खर्डे, स्वप्निल निबे, श्रीकांत खर्डे, अमोल थेटे, सुखलाल खर्डे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.



