कोल्हार( जनता आवाज वृत्तसेवा ) :- राहाता तालुक्यातील कोल्हार बुद्रुक येथील कृषक शेतकरी गटाची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.
यावेळी सभेमध्ये विविध विषयांवर चर्चा झाली. गटात अनेक दुग्धउत्पादक शेतकरी आहे. त्यांची गरज लक्षात घेता गटाअंतर्गत गायीसाठी पाळणा घेण्याचे मिटिंगमध्ये ठराव मंजुर झाला. तसेच शेतकऱ्यांचे आरोग्य लक्षात घेता लाकडी घाण्याचे उत्पादन सुरु करण्याचाही ठराव करून विजयादशमी दिनी त्याचा शुभारंभ करण्यात येणार आहे.
तसेच भविष्यात गटातील योजना आणि उपक्रम अशा अनेक विषयांवर सभेत चर्चा करण्यात आली. यावेळी गटातील सदस्यांमधून गोपीनाथ कारभारी निबे यांची नूतन उपाध्यक्ष म्हणुन निवड करण्यात आली. यावेळी उपस्थित गटातील सर्व सदस्यांनी नवनिर्वाचित निबे यांच्यावर शुभेच्छाचा वर्षांव केला.
खरं तर, कृषक शेतकरी गट हा गावातील शेतकऱ्यांनी एकत्र येवून कृषक शेतकरी गटाची स्थापना सन २०१०-११ साली केली. या माध्यमातून शेतकऱ्यांनी एकत्र येवून विविध शेतीतील प्रयोग, सरकारी योजना, नवीन पीक पद्धत, दुग्ध व्यवसाय, विक्री व्यवस्थापन, खते-औषधे खरेदी, विविध मेळाव्यांना सुरुवात केली. तसेच अनुभवी शेतकरी तसेच तज्ञांचे मार्गदर्शन, पीक व्यवस्थापन करण्यासाठी श्री. ज्ञानेश्वर खर्डे म्हणतात की, गटातील शेतकरी यांना मार्गदर्शन करण्यासाठी अनुभवी शेतकरी जसे कृषी विद्यापीठातील कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ संजय माने यांचे वेळोवेळी मार्गदर्शन होत असतात. त्यांच्या सल्ल्यानुसार रासायनिक व सेंद्रिय खतांचा वापर तसेच फवारणी विषयी योग्य सल्ला व मार्गदर्शन होत असते. यामुळे वेळ, पैसा आणि श्रम वाया जात नाही.
कृषी विभागामार्फत सरकारी योजनेमधून मिळणारी पहिली अवजारे बँक कृषक शेतकरी गटाला मिळाली असून याचा फायदा गटातीलच नव्हे तर गावातील शेतकऱ्यांना शेती करत असताना होत आहे. आज गटात सर्व प्रकारचे शेती अवजारे उपलब्ध आहेत.
कृषक गट तयार केल्याने शेतकऱ्यांना विविध फायदे झालेले आहेत. बांधावरती खत पुरवठा होतो, शेतकरी एकत्रितपणे निर्णय घेतात, अवजारे उपलब्ध होतात, शास्त्रज्ञाचे व प्रगतशील शेतकऱ्यांचे वेळोवेळी मार्गदर्शन होत असते, शासनाच्या कृषी विभागामार्फत विविध योजनेचा लाभ होतो. यामुळे शेती उत्पादनात तसेच ज्ञानात मोठ्या प्रमाणात वाढ होते. एवढेच नव्हे तर, कृषक गटातील शेतकऱ्यांना विविध पुरस्कार देवून सन्मानित केले जाते.
कृषक गटातील अनेक शेतकऱ्यांना आदर्श शेतकरी पुरस्कार, आदर्श दुग्ध उत्पादन पुरस्कार, प्रगतशील शेतकरी पुरस्कार, उत्कृष्ट शेतकरी पुरस्कार, उत्कृष्ट ऊस उत्पादक शेतकरी पुरस्कार असे पुरस्कार कृषी विभाग तसेच इतर समाज माध्यमांतून शेतकऱ्यांना प्राप्त झाले आहेत.
गट शेतीच्या माध्यमातून कापूस, सोयाबीन, गहू, डाळिंब, द्राक्ष, ऊस, चारा पिके अशी विविध पिके घेण्यात येतात. तर गट शेती ही २०१६ सालापासून शंभर रुपये बचतीपासून सुरुवात केलेली आहे. त्यामुळे गटातील शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य वाढलेले आहे.



