लोणी दि.१३ (प्रतिनिधी):-निसर्गातून खुप काही शिकता येते गरज आहे ती पर्यावरणांतील प्रत्येक घटक समजून घेण्याची मध हा आरोग्यासाठी महत्वपुर्ण आहे.मधमक्षिका पालनाची माहीती घेत खा.सुजय विखे पाटील यांच्या सौभाग्यवंती धनश्रीताई विखे पाटील यांनी श्रीरामपूर येथील प्रा. ऋषिकेश औताडे (मास्टर ट्रेनर, केंद्रीय मधुमक्षिका संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे) संचलित गोदागिरी फार्म्सच्या मधमाशीपालन विभागाला भेट दिली.
यावेळी मधमाशीपालन व त्यातून होणाऱ्या व्यवसाय निर्मितीबाबत प्रा. ऋषिकेश औताडे यांनी सखोल माहिती दिली. ती सर्व माहिती जाणून घेत मधुमक्षिका पालन व्यवसायातले विविध पैलू जाणून घेता आले. तसेच जवळच असलेल्या मधुबनामध्ये जाऊन तीन प्रकारच्या (युरोपियन, भारतीय व स्टिंगलेस) मधमाश्या देखील प्रत्यक्ष हाताळता आल्या. विशेष बाब म्हणजे मधमाशी करोडो वर्षांपासून मधनिर्मिती करण्यासोबतच निसर्गाची उत्पत्ती व चिरकाल टिकण्यासाठी लागणारे परागीभवन देखील करते, अशी अनेक गोष्टींची माहिती त्यांनी दिली. यासाठी प्रा. ऋषिकेश औताडे यांच्याद्वारे होणारे काम हे खूप मोलाचे असून ते व्यावसायिकदृष्ट्या देखील फायदेशीर आहे.
त्याचबरोबर त्यांच्या पत्नी सौ. रुपाली औताडे ह्या ०४ ते १४ वर्षांच्या महाराष्ट्रातील व भारताबाहेरील विद्यार्थ्यांना ऑनलाईन व ऑफलाईन फॉनिक्स, इंग्रजी व्याकरण, अबकस, रुबिक क्यूब आदी विषयांमध्ये मानवता एलिगंट किड्स अॅकॅडमीद्वारे प्रशिक्षण देत असल्याची माहिती मिळाली. यावेळी मध व खपली गहू बिस्कीटची नैसर्गिक चव चाखत घेतली.
प्रवरेत शिक्षक-शिक्षिका म्हणून औताडे पती-पत्नी यांनी काम केल्यानंतर त्यांनी व्यवसायात पदार्पण केले आणि निसर्ग जोपासना, प्रशिक्षित कौशल्य विकास ते सातत्याने करत आहेत ही तरुणांसाठी खूप प्रेरणादायी बाब आहे. अशी प्रतिक्रिया सौ.धनश्रीताई विखे पाटील यांनी देऊन फार्म्सद्वारे मधमाशी पालनाबरोबरच गांडूळ खत, धिंगरी अळिंबी, खपली गहू व मध उत्पादन देखील घेतले जात आहे. निश्चितच आवड जोपासणाऱ्यांनी आणि या क्षेत्रात काम करण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांनी गोदागिरी फार्म्सला भेट देऊन आपली व्यावसायिक वाटचाल समृद्ध करावी.असेही सांगितले



