पाथर्डी (जनता आवाज वृत्तसेवा):- अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात आडगाव येथील राष्ट्रीय सुरक्षा दल बीएसएफमध्ये गेल्या वीस वर्षापासून सेवेत कार्यरत असलेले पांडूरंग मल्हारी वाघमोडे पुलामा अहमदाबाद गुजरात येथे ड्युटीवर असताना आजारी पडले परंतु उपचारा दरम्यान त्यांचे निधन झाल्याने मंगळवारी पहाटे त्यांचा मृतदेह पुणे विमानतळावर पोहोचला तेथून राष्ट्रीय सुरक्षा दलाच्या सैनिकांनी वाघमोडे यांच्या मूळगावी आडगाव येथे सकाळी नऊ वाजता आणल्यानंतर त्या ठिकाणी दुःखद अंतकरणाने शासकीय इतमांमध्ये दुपारी एक वाजण्याच्या सुमारास बी एस एफ च्या जवानांनी हवेत दोन राऊंड फायर करून त्यांना मानवंदना दिल्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास पांडुरंग वाघमोडे यांचे पार्थिव आडगावात पोहोचल्यानंतर गावातील ग्रामस्थांनी फुलांनी सजवलेल्या रथामध्ये त्यांचे पार्थिव ठेवले चौकात चौकात रथावर पुष्पवृष्टी करत त्यांना दुःखद अंतकरणाने अखेरचा निरोप देण्यात आला.यावेळी आडगावमध्ये कडकडीत बंद ठेवून या दुःखद घटनेने ग्रामस्थांमधून मोठी हळहळ व्यक्त करण्यात येत होती.पांडुरंग वाघमोडे यांच्या पश्चात पत्नी,दोन मुली,एक मुलगा असा परिवार आहे.
अंत्यविधी प्रसंगी भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले,नायब तहसीलदार दिग्विजय पाटील,राष्ट्रीय सुरक्षा दलाचे गोविंद सिंह,पोलीस उपनिरीक्षक शिवाजी तांबे,मार्केट कमिटीचे संचालक जिजाबापू लोंढे,माजी सरपंच संतोष शिंदे,मंडल अधिकारी श्रीमती मनाळ,सहाय्यक फौजदार हरिभाऊ दळवी,विजय भिंगारदिवे,भगवान टकले यांच्यासह पोलीस प्रशासन,महसूल विभाग व माजी सैनिक ग्रामस्थ महिला भगिनी तरुण वर्ग मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.



