लोणी दि.११( प्रतिनिधी):-ज्ञानापेक्षा श्रेष्ठ या जगात काही नाही त्यामुळे समाज शिक्षित होणे गरजेचे आहे हे ज्योतिराव फुले यांनी ओळखले.समाजात बदल घडविण्याचा एकमेव मार्ग म्हणजे शिक्षण .त्यामुळे शिक्षणाशिवाय पर्याय नाही.
म्हणून ज्योतिराव फुले यांनी शिक्षणाचा पुरस्कार केला समाजातील वंचित घटकांना शिक्षण देण्याचे ठरविले. साक्षर स्त्रिच सुसंस्कृत समाज घडवू शकते त्याची सुरुवात त्यांनी आपल्या घरापासूनच म्हणजे आपली पत्नी सावित्रीबाई फुले यांना शिक्षण देऊन केली महात्मा ज्योतिराव फुले समाजासाठी जीवन समर्पित करणारे युगपुरुष होते असे प्रतिपादन डॉ.मोहसीन तांबोळी यांनी केले. लोणी पायरेन्स आय बी एम येथे महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमात ते बोलत होते.कार्यक्रमास पायरेन्सचे सचिव डॉ. निलेश बनकर, प्रा.प्रमोद बोऱ्हाडे डॉ, सतीश बिडकर प्रा.धनंजय बोऱ्हाडे. प्रा.ऋषिकेश धर्माधिकारी प्रा. योगेश आहेर प्रा. ऋतुजा कोतकर प्रा.पूजा परजणे प्रा. रेणुका तनपुरे प्रा.कृष्णा बोरुडे श्री अमोल शिरसाठ श्री रावसाहेब कानडे श्री महेंद्र खर्डे, प्रा. संजय औताडे यांचे सह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते
आपल्या मार्गदर्शनात डाॅ.तांबोळी म्हणाले, समाजात नवविचार जागृत करून त्याला पुनर्जीवन प्राप्त करून देण्याचे महान कार्य ज्योतिबांनी केले. १९ व्या शतकातील बालविवाह अस्पृश्यता सती यासारख्या समाजास अधोगतीस नेणाऱ्या कुप्रथांना प्रखर विरोध केला व स्त्रिमुक्ती चळवळीला चालना दिली त्यामुळे शूद्र व अतिशूद्रांकरीता सारे जीवन समर्पित करणारे ज्योतिराव फुले खरे युगपुरुष होते. महीला मुक्तीचे एकमेव साधन म्हणजे शिक्षण होय शिक्षणाशिवाय समाजातील वाईट प्रथांना आळा घालने अशक्य आहे .त्यामुळे स्त्रि सुशिक्षित होणे गरजेचे आहे. आदर्श समाज रचनेसाठी शिक्षणाची गरज आहे त्यामुळे ज्योतिराव फुले यांनी स्त्रि शिक्षणाचा पुरस्कार केला स्त्रियांना शिक्षणाची दरवाजे उघडे करून एका नवीन युगाची सुरुवात केली . समाजातील विषमता नष्ट करण्यासाठी महात्मा ज्योतिराव फुले यांनी “सत्यशोधक” समाजाची स्थापना केली प्राथमिक शिक्षण मोफत, सार्वजनिक व सक्तीचे केले जावे अशी मागणी करणारे महात्मा जोतिबा फुले हे आशिया खंडातील पहिले शिक्षण तज्ञ आहेत त्यांचा आदर्श जतन करण्याचे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डाॅ.निलेश बनकर यांनी तर आभार प्रा.संजय औताडे यांनी मानले.




