कोल्हार ( संजय कोळसे ) :- ३३ वर्षांच्या प्रचंड मोठ्या कालावधीपश्यात झालेल्या मित्र – मैत्रिणींच्या गाठीभेटी. सुख – दुःखाच्या गप्पागोष्टी. एकत्रित स्नेहभोजन. गाण्यांवर नृत्य. चुटकुले आणि विनोदाची किनार. शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त करतांना दिलेली देणगी. संपूर्ण क्षणांचे फोटो तथा व्हिडीओ चित्रीकरण. अशा भरगच्च कार्यक्रमांनी इयत्ता १० वीच्या १९९० च्या बॅचचा कोल्हार येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या आवारात यादगार स्नेहमेळावा संपन्न झाला. एखाद्या लग्नसमारंभाची झलक यावी असे डेकोरेशन आणि नियोजन सर्वांसाठी अविस्मरणीय ठरले.
कोल्हार भगवतीपूर येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलमधील १९९० साली इयत्ता १० वीच्या सर्व तुकडीमधील उत्तीर्ण झालेल्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा रविवार दि. ९ एप्रिल रोजी संपन्न झाला. यासाठी पुणे, मुंबई, सोलापूर, नाशिक, संभाजीनगर, वैजापूर, नेवासा, अहमदनगर, श्रीरामपूर, कोळपेवाडी, प्रवरा परिसर आदि भागातून तब्बल ७० मित्र – मैत्रिणींनी सहभाग नोंदविला. सकाळी ९ ते सायंकाळी ५ : ३० वाजेपर्यंत दिवसभर हा आनंदसोहळा सुरु होता.
प्रारंभी सकाळच्या सत्रात कार्यक्रमस्थळी आलेल्या मित्र – मैत्रिणींचे फेटे बांधून गुलाबपुष्प देत जोरदार स्वागत करण्यात आले. नाष्टा करता – करता जुन्या स्मृतींना उजाळा देत गप्पांना आणि हास्यविनोदाला सुरुवात झाली. त्यानंतर सजावट केलेल्या शाळेच्या हॉलमध्ये प्रवेश करीत कार्यक्रम सुरु झाला. स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष अॅड. सुरेंद्र खर्डे, प्राचार्य सुधीर वाघमारे, पर्यवेक्षिका सौ. संजीवनी आंधळे, त्यावेळचे माजी वर्गशिक्षक आसाराम विलायते, श्रीमती अलका कोंडेकर आदि मान्यवरांच्या उपस्थितीत विद्यालयाला देणगी देण्यात आली. याशिवाय सध्या अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे स्थायिक असलेल्या चंद्रकांत काशिनाथ नलगे यांनी शाळेला १ लाख रुपये देणगी जाहीर केली. यावेळी मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
दुपारच्या सत्रात जमलेल्या मित्र – मैत्रिणींनी समोर येत व्यासपीठावरुन स्वपरिचय करून दिला. एकत्रित बसून सर्वांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला. नाच मोरा आंब्याच्या बनात नाच या व अन्य गाण्यांवर सर्वांनी मनसोक्त नृत्य करीत आनंद लुटला. अनेकांनी आपले मनोगत व्यक्त करीत जीवनातील आपला आजपर्यंतचा प्रवास व अनुभव कथन केला. शाळेला फेरफटका मारीत १९९० साली ज्या वर्गांमध्ये शिक्षण घेतले, त्या वर्गांमध्ये जात ३३ वर्षांच्या जुन्या आठवणी ताज्या केल्या.
सायंकाळच्या सत्रात चहापाणी झाले. सरतेशेवटी ये दोस्ती हम नही तोडेंगे हे गाणे ऐकतांना सर्वांना अश्रू अनावर होत अक्षरशः रडले. निरोप घेतांना एकमेकांच्या गळाभेट घेत सर्वांना गहिवरून गेले. आपण आता हा दिवसभराचा सुखद अनुभव, आनंद, चैतन्य सोडून पुन्हा आपल्या दैनंदिन प्रापंचिक जगात परतत आहोत हा प्रसंग सर्वांसाठी संवेदनशील बनला. या संपूर्ण दिवसभराचे क्षण चिरकाल ताजे राहावेत म्हणून कार्यक्रमाचे फोटो तसेच व्हिडीओ चित्रीकरणदेखील करण्यात आले.
हा संपूर्ण स्नेहमेळावा यशस्वी करण्याकरिता पत्रकार संजय कोळसे, रमेश राऊत, मयूर आसावा, डॉ. सुरेश गुंड, विष्णू खर्डे, अशोक भनगडे आदिंनी विशेष परिश्रम घेतले.