सात्रळ( जनता आवाज वृत्तसेवा ):-‘सहकारातून समृद्धीकडे’ हे मध्यवर्ती आशयसूत्र घेऊन ‘उत्सव माय मातीचा, लोकजीवन आणि लोकसंस्कृतीचा’ या उक्तीनुसार अश्विन शुद्ध प्रतिपदेला देवीच्या नवरात्राची सुरुवात झाली. या पवित्र काळात प्रवरा शैक्षणिक संकुलात विद्यार्थी केंद्रीत वैविध्यपूर्ण सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम संपन्न झाले. नऊ दिवसात आदिशक्तीच्या नऊ रूपातील पराक्रमकथा, नारीतत्त्वाचे शक्तीमान रूप, भारताच्या सांस्कृतिक इतिहासातील मातृदैवतांचे महत्त्व, महिला आणि श्रम संस्कृतीचा मानसन्मान, महिला संरक्षण, आरोग्य जागर करणाऱ्या व्याख्यानमाला, व्यावसायाभिमुख कौशल्य विकसित करणाऱ्या कार्यशाळा अशा कौशल्याधिष्ठित कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये नवचेतना आणि आत्मनिर्भरता जागृत करण्यात आली. प्रवरा शारदीय नवरात्रौत्सवाच्या माध्यमातून भारतीय परंपरा आणि संस्कृतीचे जतन-संवर्धन होत असल्याचे मत प्रतिपादन प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मा. डॉ. सुष्मिता विखे पाटील यांनी केले.
सात्रळ येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्रवरा शारदीय नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात येत आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहुरी पंचायत समितीच्या मा. सभापती सौ. मंदाताई डुक्रे पाटील ह्या होत्या. प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सोपानराव शिंगोटे यांनी केले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. सुश्मिता विखे पाटील पुढे म्हणाल्या,” मुलांनी नोकरी करणारे नाही तर नोकरी देणारे करण्यासाठी बिल्डिंग प्रवरा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. यानिमित्ताने विद्यार्थी व स्टाफ यांचे १५२ स्टॉल लोणी येथे दि. १८ ते २० ऑक्टोबर या दरम्यान लावण्यात येणार आहेत. उद्योजकता विकास, विक्री व्यवस्थापन, मार्केटिंग स्किल, जाहिरातीचे युग, खरेदी-विक्री कला आणि नफा या संबंधाची माहिती विद्यार्थ्यांना कृतीतून अनुभवता यावी असा व्यापक उद्देश ह्या बिल्डिंग प्रवरा उपक्रमाचा आहे.भारत देश अतिप्राचीन काळापासून शिव-शक्तीचा उपासक आहे. नवदुर्गा म्हणजे दृष्टांचे निर्दालन करणारी देवता होय ! म्हणूनच पवित्र हाताने, पवित्र मनाने आणि सदविचार, आचाराने हा नवदुर्गेचा नवरात्रोत्सव आपण सर्वजण मिळून साजरा करूया.”
याप्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी “स्त्रीशक्ती जागर” नाटिका सादर केल्या. यावेळी विविध कर्तृत्ववान स्त्रियांच्या भूमिका विद्यार्थिनींनी साभिनय सादर केल्या. कार्यक्रमाचे आभार महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. दीपक घोलप यांनी मांनले. सूत्रसंचालन सात्रळ क्लस्टरचे समन्वयक डॉ. नवनाथ शिंदे यांनी केले. याप्रसंगी उपप्राचार्या डॉ. जयश्री सिनगर, सर्व सहकारी प्राध्यापक आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी प्रचंड उत्साहात मोठ्या संख्येने उपस्थित होते.