लोणी( जनता आवाज वृत्तसेवा ):-भाजीपाला उत्पादनाचे मोठे क्षेत्र आपल्या परिसरात आहे. उत्पादीत माल बाहेर पाठविण्या एैवजी स्थानिक पातळीवरच चांगल्या भावाने विक्री करण्याची सुविधा शेतक-यांना मिळाली तर त्याचा अधिक लाभ मिळू शकेले यादृष्टीने बाजार समितीने उत्पादक आणि ग्राहकांची गरज ओळखून सुरु केलेले फळेभाजीपाला विक्री केंद्र हे कृषि व्यवसायाच्या दृष्टीने महत्वपूर्ण ठरेल असा विश्वास महसूल तथा पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.
राहाता बाजार समितीच्या लोणी खुर्द येथील उपबाजार आवारात शनिवारी भाजीपाला मार्केटचा शुभारंभ ना.विखे पाटील यांच्या हस्ते झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील होते.जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील,सभापती ज्ञानेश्वर गोंदकर,उपसभापती अण्णासाहेब कडू,माजी सभापती तुकाराम बेंद्रे,बापूसाहेब आहेर,भाऊसाहेब जेजुरकर,शांतीनाथ आहेर,प्रवरा बँकेचे उपाध्यक्ष मच्छीन्द्र थेटे,ट्रक्स सोसायटीचे अध्यक्ष नंदकिशोर राठी,सरपंच कल्पना मैड,बाळासाहेब आहेर,बापूसाहेब लहारे,सहाय्यक निबंधक श्री.खेडकर,किसनराव विखे,चेअरमन अशोकराव धावणे,कारभारी आहेर,राहुल घोगरे,रामनाथ आहेर,राहुल धावणे,ज्ञानदेव चौधरी, सचिव सुभाष मोटे आदींसह मान्यवर यावेळी उपस्थित होते.
ना.विखे पुढे म्हणाले की,राज्य आणि केंद्र सरकारने शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून अनेक योजना सुरू केल्या.कांदा,सोयाबीन,दूध अनुदान, सोयाबीन पीक विमा यासह अनेक योजनांद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा केली. महायुती सरकारने सुरु केलेल्या पीक विमा योजनेच्या माध्यमातून १२२ कोटी रुपये शेतक-यांना मिळाले असून, सोयाबीन व कापूस उत्पादकांना १० कोटी २१ लाख रुपयांचे अनुदान खात्यात वर्ग झाले असल्याचे त्यांनी सांगितले. पीएम किसान व नमो किसान योजनेद्वारे शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली.
शेतकऱ्यांना शेतीसाठी मोफत वीज देताना मागील थकबाकीची रक्कम माफ करीत शून्य थकबाकीची बिले दिली आहेत. कांदा, दूध व शेतीमालाला चांगले दर मिळावेत म्हणून धाडसी निर्णय घेतले. राहाता बाजार समितीने कांदा, डाळींब, धान्य व इतर शेतमालाला चांगले भाव देऊन शेतकऱ्यांना आधार देण्याचे काम केल्याबद्दल त्यांनी सर्व संचालकांचे अभिनंदन केले.
लोणी येथे भाजीपाला मार्केट सुरू केल्याने प्रवरा परिसरातील शेतकऱ्यांना आपला भाजीपाला विक्रीस आणण्याची सोय झाली. किरकोळ विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांना इतरत्र जाण्याची गरज भासणार नाही. सर्वसामान्यांना दररोज भाजीपाला उपलब्ध होणार असल्याने त्यांचीही उत्तम सोय झाली आहे. शेतकऱ्यांना सरकारने भरभरून मदत केल्याने यावर्षीची दिवाळी गोड होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना बाजार समितीच्या संचालक मंडळाचे कौतुक केले.स्थानिक व्यापारी आणि शेतकऱ्यांनी या सुविधेचा फायदा घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.यावेळी ना.विखे पाटील यांच्या हस्ते भाजीपाला व्यापाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.लोणीच्या शेळी-मेंढी बाजार आवारात बुधवार वगळता इतर दिवशी भाजीपाला मार्केट सुरू राहणार असल्याने त्याचा लाभ घेण्याचे आवाहन सभापती ज्ञानेश्वर गोंदकर यांनी केले.कार्यक्रमाला बाजार समितीचे संचालक,विविध संस्थांचे पदाधिकारी,शेतकरी,व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



