कोल्हार( जनता आवाज वृत्तसेवा):-अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी खा. डॉ. सुजय विखे पाटील व जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दाढ बुद्रुक येथील श्रद्धा ग्रामविकास प्रतिष्ठान आयोजीत नवरात्र उत्सवानिमित्त सन्मान नारिशक्तीचा, जागर स्त्री शक्तीचा या शिर्षकाखाली दाढ बुद्रुक येथील ७२० महिलांना मोहटादेवीचे दर्शन घडविले.
शालिनीताई विखे पाटील यांच्या हस्ते विधिवत बसचे पूजन करून १४ बसेसमध्ये ७२० महिला भगिनी व ६० स्वयंसेवक असे एकूण ७८० भाविक यात्रेसाठी रवाना झाले. प्रवासादरम्यान श्रद्धा ग्रामविकास प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांनी नाष्टा, चहा, जेवण तसेच दर्शनासाठी परिपूर्ण नियोजन केले. प्रथम विनाथांबा सर्व बस श्री क्षेत्र मोहटादेवी येथे नेण्यात आल्या. पायी दिडींने दोन किलोमीटर चालत जाऊन देवीचे दर्शन घेतले. चहा, नाष्टा देऊन श्रीक्षेत्र मढीकडे प्रस्थान करून दर्शन घेतले. त्यानंतर श्रीक्षेत्र वृद्धेश्वर येथे दर्शन झाले. तेथे थकलेल्या महिला भगिनींनी घरगुती जेवणाचा मनमुरादपणे आस्वाद घेतला. त्यानंतर परतीचा प्रवास सुरू झाला. येताना श्रीक्षेत्र शनिशिंगणापूर आणि कोल्हार येथील भगवती माता मंदिर येथे दर्शन घेऊन दाढ बुद्रुक येथे यात्रेचा समारोप झाला.
सर्व महिला भगिनींनी यात्रा प्रवासा दरम्यान देवाचे गीत,भजन, भारूड गायनाने मनमुराद आनंद लुटला. अशी माहीती श्रद्धा ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष योगेश तांबे यांनी दिली.यात्रा यशस्वी होण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार व्यक्त करून श्रद्धा ग्रामविकास प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांनी भाविकांना धन्यवाद दिले. असेच सहकार्य व प्रेम मिळाले तर आणखी नवनवीन उपक्रम राबविण्यासाठी ऊर्जा मिळेल, अशी अपेक्षा यावेळी प्रतिष्ठानच्यावतीने करण्यात आली.



