नवी दिल्ली (जनता आवाज वृत्तसेवा):- निवडणूक आयोगाने आज महाराष्ट्र आणि झारखंडमधील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी महाराष्ट्रात एकाच टप्प्यात मतदान होणार असल्याचे जाहीर केले. त्यानुसार 20 नोव्हेंबरला राज्यात मतदान होणार असून, 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.
निवडणूक आयोगाने यावेळी महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकांसह 48 विधानसभा आणि 2 लोकसभा मतदारसंघांतील पोटनिवडणुकीच्या तारखाही जाहीर केल्या.
महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात आणि झारखंडमध्ये दोन टप्प्यात निवडणुका होणार आहेत. पहिल्या टप्प्यात 13 नोव्हेंबरला आणि दुसऱ्या टप्प्यात 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. 23 नोव्हेंबरला निकाल लागणार आहे.
विधानसभेच्या 48 आणि लोकसभेच्या 2 जागांसाठी पोटनिवडणूकही दोन टप्प्यात होणार आहे. 13 नोव्हेंबरला विधानसभेच्या 47 आणि लोकसभेच्या एका जागेसाठी मतदान होणार आहे. एक विधानसभा आणि एका लोकसभेच्या जागेसाठी 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. 23 नोव्हेंबरला निकालही लागणार आहे.
महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ 26 नोव्हेंबरला, तर झारखंड विधानसभेचा कार्यकाळ 5 जानेवारी 2025 रोजी संपत आहे.
23 ते 29 ऑक्टोबर दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करता येणार
30 ऑक्टोबर उमेदवार अर्जाची छाननी
4 नोव्हेंबरला अर्ज मागे घेता येणार
20 नोव्हेंबरला राज्यात मतदान
23 नोव्हेंबरला मतमोजणी